esakal | अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested News.jpg..jpg

बांधकाम व्यवसायिकाने अंगणात लावलेले अंदाजे ३० हजार रुपये किंमतीचे चंदनाचे झाड चोरणाऱ्याला वीस दिवसांनी पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली. अनिल उर्फ प्रभाकर साहेबराव पुंगळे (३२, रा. उफळी ता. सिल्लोड, ह.मु. मिटमिटा गाव) असे आरोपीचे नाव आहे. 

अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: बांधकाम व्यवसायिकाने अंगणात लावलेले अंदाजे ३० हजार रुपये किंमतीचे चंदनाचे झाड चोरणाऱ्याला वीस दिवसांनी पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली. अनिल उर्फ प्रभाकर साहेबराव पुंगळे (३२, रा. उफळी ता. सिल्लोड, ह.मु. मिटमिटा गाव) असे आरोपीचे नाव आहे. 

प्रकरणात बांधकाम व्यवसयिक निशांत ओमप्रकाश चंद्रमोरे (३४, रा. छत्रपतीनगर, गारखेडा परिसर) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, ६ जूनरोजी निशांत हे मुंबईहून औरंगाबादला येत असताना अंगणातील २२ वर्षांपूर्वीचे चंदनाचे झाड कोणीतरी कापून नेल्याचे घरच्यांनी त्यांना सांगितले. निशांत यांनी औरंगाबादला आल्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठत दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात  

दोन हजारात ठरला व्यवहार 
२४ जून रोजी आरोपी पुंगळे हा चंदनाची लाकडे विकणार असल्याची माहिती पुंडलिक नगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार केला. त्यानंतर आरोपीने ग्राहकाला बीड बायपास येथे भेटण्यासाठी बोलावले. आरोपीने चार हजार रुपये किलो चंदनाचे लाकुड विक्री करत असल्याचे सांगितले. मात्र दोन हजार रुपये किेलो प्रमाणे त्यांचा व्यवहार झाला. 

सापळा रचून केली अटक 
व्यवहार ठरल्यानंतर आरोपीने रात्री ९ वाजता शिवाजीनगर भागात लाकुड आणून देतो असे सांगितले होते. त्यानुसार पुंडलिकनगर ठाण्याचे डी. बी. पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे, राजेश यदमळ, जालिंदर मांन्टे, विलास डोईफोडे, दिपक जाधव, रवि जाधव कल्याण निकम, निखील खराडकर आदींनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याने चोरीची कबुली दिली. 

 हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....

शनिवारपर्यंत पोलिस कोठडी 

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला शनिवापर्यंत (ता.२७) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. यु. न्याहारकर यांनी दिले. सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी आरोपीच्या साथीदारांना अटक करणे आहे. तसेच आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्हे केले याचा तपास देखील करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. 

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार