Coronavirus : व्हिडिओ कॉलिंगद्वारे पूजा सांगत केला दशक्रिया विधी

दीपक जोशी
रविवार, 5 एप्रिल 2020

वाळूज बजाजनगर परिसरात रोजंदारीवर काम करणाऱ्या अकोला येथील लक्ष्मण वाघमारे या कामगाराचा एकुलता एक केवळ १० वर्षे वयाचा मुलगा २६ मार्चला अकाली त्यांना सोडून गेला. या गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

औरंगाबाद : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा त्रास फक्त आपल्यासारख्या चालत्या बोलत्या जीवांनाच आहे, असं नाही. तर जीव गेल्यानंतरही त्या बिचाऱ्या मृतात्म्याला सुखाचे अंत्यसंस्कार होणे नशिबी नव्हते. पण लिंबेजळगावच्या गुरुजींनी यावर उपाय शोधला आणि व्हिडिओ कॉलिंगद्वारे पूजा सांगत केला दशक्रिया विधी. 

कोरोनाच्या संकटामुळे आणि पोलिसांच्या माराच्या धास्तीमुळे आपल्या एकुलत्या एक मुलाच्या दशक्रियेसाठी बाहेर जाणे वाळूजजवळील बजाजनगरच्या एका कामगाराला अशक्य झाले. संचारबंदीमुळे सगळं काही बंद होतं. पण दहा दिवसांपूर्वी अकाली मरण पावलेल्या आपल्या मुलाचा दशक्रिया विधी कसा पार पाडायचा याची विवंचनाच त्या कामगाराला लागून राहिली होती.

वाळूज बजाजनगर परिसरात रोजंदारीवर काम करणाऱ्या अकोला येथील लक्ष्मण वाघमारे या कामगाराचा एकुलता एक केवळ १० वर्षे वयाचा मुलगा २६ मार्चला अकाली त्यांना सोडून गेला. या गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

बैलगाडीतून मृतदेह नेला

संतोष वाघमारेच्या निधनाचे वृत्त पसरताच बजाजनगरातील इंद्रप्रस्थ काॅलनीतील रहिवाशी अक्षरशः गहिवरले. यावेळी जवळ कुणीही नातेवाईक नसतांना मानलेले मामा बाबासाहेब सुकासे यांनी संतोषचा मृतदेह संचारबंदीचे उल्लंघन न करता बैलगाडीतून स्मशानभूमीपर्यंत नेला आणि आई-वडीलांसह केवळ चार जणांच्या उपस्थितीत त्याचा अंत्यविधी उरकून घेतला.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

हातावर पोट भरणारे कामगार लक्ष्मण वाघमारे व पत्नी जनाबाई शनिवारी (ता.4) आपल्या मुलाचा दशक्रीया विधी कुठे करावा, कोण करणार या चिंतेने ग्रस्त होते. बाहेर पोलिसांनी दशक्रीया विधीचा कार्यक्रम करण्यास मज्जाव केला. मानलेले मामा सुकासे पाटील यांच्यासोबत त्यांनी कायगाव येथील गोदावरीचे तीर गाठले. मात्र तिथेही सामसूम. तिथेही विधी करण्यास मनाई असल्याने व कुणाशीच संपर्क न झाल्याने ते खिन्न मनाने बजाजनगरात घरी परतले.

आईची वेडी माया स्वस्थ बसू देईना

लेकराबद्दल पाहिलेली सगळी स्वप्नं पाण्यात गेली, पण आता त्याचा दहावा तरी रीतीभातीनं झाला पाहिजे, अशी आईची वेडी माया कुणाला स्वस्थ बसू देईना. मुलाच्या दहाव्याचा विधी मंत्रोपचाराने झालाच पाहिजे, यासाठी तिने आग्रहच धरला. अखेर त्या मामांनी आपल्या ओळखीचे लिंबेजळगाव (ता.गंगापूर) येथील वयोवृद्ध पुरोहित बाळासाहेब जोशी यांच्या कानी ही अडचण घातली.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

जोशी गुरूजींनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तोडगा सांगितला. ''तुम्ही तयारी करा, मी व्हिडिओ कॉलिंगने दशक्रिया विधीचे मंत्रोच्चार, पूजा विधी सांगतो," असे सांगितले. घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत, अगदी चार जणांच्याच उपस्थितीत वाघमारे कुटुंबाने पूजा मांडली. जोशी गुरुजींनी 45 मिनिटांच्या व्हिडिओ कॉलवर साग्रसंगीत पूजा सांगितली.  

अशा रीतीने हा दहावा पार पडला. दुःखाच्या प्रसंगात आणि अशा अडचणीतही केवळ मानसिक समाधान म्हणून करावयाच्या पारंपरिक उपचारांला या गुरुजींनी आधुनिकतेची जोड दिली आणि त्या दुःखी कुटुंबाला थोडेफार का होईना, समाधान मिळाले. त्या कुटुंबाने जोशी गुरुजींचे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Pinddan Dashkriya Vidhi In Coronavirus Lockdown