महापालिकेत रंगबिरंगी फायली पण कशासाठी?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

  • महापालिकेत फायलींचे गठ्ठे दिवसेंदिवस वाढत असून, या गठ्ठ्यात कोणत्या विभागाची कोणती फाइल हे ओळखणे अवघड होते. त्यामुळे आयुक्तांनी प्रत्येक विभागाला एक रंग ठरवून दिला आहे. त्या विभागाच्या फाईलला आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार रंगाचे कव्हर राहणार आहे. 

औरंगाबाद- महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आणखी एक आदेश काढले आहेत. निधीच्या कमतरचे अभावी महापालिकेत फायलींचे गठ्ठे दिवसेंदिवस वाढत असून, या गठ्ठ्यात कोणत्या विभागाची कोणती फाइल हे ओळखणे अवघड होते. त्यामुळे आयुक्तांनी प्रत्येक विभागाला एक रंग ठरवून दिला आहे. त्या विभागाच्या फाईलला आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार रंगाचे कव्हर राहणार आहे. 

हे ही वाचाः तीनशे कोटींच्या कामाच्या चौकशीला का दिली मुदतवाढ

महापालिकेच्या तिजोरीत अनेक वर्षांपासून खडखडाट आहे तर दुसरीकडे तिजोरीचा विचार न करता कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली जात आहे. मंजूर झालेल्या फाइल अनेकवेळा आयुक्त, अधिकारी स्तरावरच तुंबून ठेवल्या जातात. मात्र या फाईलच्या गठ्ठ्यात एखादी महत्त्वाची फाइल सापडत नाही. त्यामुळे फाईलच्या रंगावरूनच ती कोणत्या विभागाची आहे हे ओळखता आले पाहिजे, यासाठी आयुक्तांनी फायलींना विभागानुसार कर ठरवून दिले आहेत. जेणेकरून फाईलचा रंग पाहताच ती कोणत्या विभागाची आहे हे अधिकाऱ्यांच्या लक्षात येणार आहे. महापालिकेच्या सर्व फायलींचा रंग खाकी होता, मात्र आता अधिकाऱ्यांच्या टेबलावर रंगबिरंगी फाइल पाह्यला मिळणार आहेत. 
 
अधिकाऱ्यांच्या अक्षराची ओळख होईना 
आयुक्तांनी फायलीमध्ये असणाऱ्या त्रुटींची यादीच दिली आहे. त्यात टिप्पणी परिपूर्ण नसणे, टिप्पणी व पत्रव्यवहाराला पेजींग न करणे, फाईलमध्ये टिप्पणी परिपूर्ण नसणे, स्वाक्षरीखाली नाव पदनाम, तारीख नसणे, तांत्रिक बाबींची पूर्तता केलेली नसणे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अक्षर ओळख. अनेक अधिकाऱ्यांनी काय शेरा मारला आहे हे सुस्पष्ट अक्षर नसल्याने ओळखणे अवघड होत आहे. त्यामुळे कार्यक्षमता घटत असल्याचे आयुक्तांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. 

क्लिक कराः स्मार्ट सिटीतून वगळली जाणार ही कामे
 
असे आहेत रंग 
पाणी पुरवठा    निळा 
रस्ते               पिवळा 
विद्युत            विटकरी 
कर वसुली     पोपटी 
ड्रेनेज            नारंगी 
नगर रचना   फिकट निळा 
आरोग्य       लाल 
अग्निशमन  हिरवा 
घनकचरा      जांभळा 
एनयुएलएम   फिकट ग्रे 
मालमत्ता      फिकट पिवळा 
उद्यान           मोरपंखी 
पशुधन      फिकट हिरवा 
विधी           फिकट आकाशी 
शिक्षण        राणी रंग 
आस्थापना-1 गुलाबी 
आस्थापना-2  तपकिरी 
क्रीडा              मेहंदी 
सांस्कृतिक    गडद आकाशी 
जनसंपर्क     नेव्ही ब्लू 
संगणक     फिकट जांभळा 
घरकूल      गडद ग्रे 
निवडणूक    पांढरा 
उर्वरित          खाकी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order of Municipal Commissioner Astikumar Pandey