औरंगाबादच्या कोविड केअरमध्ये गुटखा आणि दारूही, रुग्णांचे अजब शौक

माधव इतबारे
Thursday, 24 September 2020

औरंगाबाद येथील कोविड केअर केंद्रामध्ये रुग्णांकडून विविध गोष्टींची मागणी केली जात आहे.

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये गुटख्यासह दारू छुप्या मार्गाने येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. घरातून डबे मागविण्याच्या नावाखाली काहीजण असे प्रकार करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने सावध पवित्रा घेतला असून, गैरप्रकार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची सूचना कोविड केअर सेंटरची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला करण्यात आली आहे.

महापालिकेने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेले सुमारे चार हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. त्‍यांना औषधींसह नाश्‍ता, दोनवेळा चहा, दोनवेळा जेवण, काढा महापालिकेतर्फे पुरविला जातो. मात्र जेवणाबाबत अनेकजण तक्रारी करतात. काही जणांची घरातून डबा पुरविण्याची मुभा मिळावी, अशी मागणी असते. महापालिकेलादेखील जेवणावर मोठा खर्च करावा लागत आहे.

औरंगाबाद शहरावर आता सातशे 'सीसीटीव्ही'ची नजर !  

त्यामुळे ज्यांची इच्‍छा असेल ते घरातून डबा मागवू शकतात, असा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र घरातून येणाऱ्या डब्यासोबत व्यसन पूर्ण करण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. काहींनी गुटखा पुड्या, काहींनी चक्क दारू मागविल्याचे समोर आले. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पार्सलची तपासणी केली जात आहे. असे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अधिकाऱ्यांनी हा प्रकार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या कानावर टाकला असता, त्यांनी गंभीरपणे दखल घेतली. व्यसनी रुग्णांमुळे सेंटरमधील वातावरण बिघडू शकते. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

संपादन- गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patients Demand Gutkha, Liquor In Covid Care Centres Aurangabad News