esakal | लातूर : लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी, ५० लाखांसाठी चिमुकल्याचे अपहरण केल्याप्रकरणी चौघे अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Police

कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापार थांबला. कर्ज फेडणे अवघड झाले. त्यामुळे पन्नास लाखाची खंडणी मागावी या उद्देशाने एका पाच वर्षीय मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

लातूर : लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी, ५० लाखांसाठी चिमुकल्याचे अपहरण केल्याप्रकरणी चौघे अटकेत

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापार थांबला. कर्ज फेडणे अवघड झाले. त्यामुळे पन्नास लाखाची खंडणी मागावी या उद्देशाने एका पाच वर्षीय मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. तब्बल ७० दिवसानंतर हा गुन्हा उघडकीस आला आहे. याबाबत माहिती अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी शुक्रवारी (ता.२७) येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

सांगवी (ता. रेणापूर) येथून ता.११ सप्टेंबर रोजी रियांश नीळकंठ सावंत (वय पाच) या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होते. २६ तासानंतर हा चिमुकला चाटा (ता.रेणापूर) येथे मिळून आला होता. पण आरोपी मात्र फरार होते. आपला मुलगा सापडल्याने सावंत कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. पण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस मात्र अस्वस्थ होते. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी तपास सुरुच ठेवला होता. यातून पोलिसांनी आरोपीचा सुगावा लागला आणि अपहरणाचे हे प्रकरण उघडकीस आले.  यात पोलिसांनी केरबा ऊर्फ किरण लक्ष्मण मुदाळे (वय २७), मारुती लक्ष्मण मुदाळे (वय ३०, दोघे  भाऊ, रा. काळमाथा, ता. औसा), दीपक मुदाळे (वय ३०, पुतण्या) व गजानन उर्फ गज्जू सावत (रा. सांगवी) या चौघांना अटक केली आहे.

या प्रकरणातील चिमुकल्या रियांशचे वडील नीळकंठ सावंत यांचे ठाण्यात किराणा होलसेलचे दुकान आहे. ठाण्यातच केरबा मुदाळे याचेही दुकान आहे. पण कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. व्यापार थांबला. कर्ज फेडायचे कसे असा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा राहिला. ते आपल्या गावाकडे आले. दरम्यानच्या काळात नीळकंठ सावंत यांचा मुलगा रियांश (वय पाच) हा त्याच्या आजी आजोबा सोबत गावाकडे (सांगवी) येथे आला होता. सावंत श्रीमंत आहे. त्यांच्या मुलाचे अपहरण करून त्यांच्याकडून पन्नास लाख खंडणी मागता येईल या उद्देशाने त्यांनी कट रचला. यात त्यांनी साठ हजारांची कार खरेदी करून त्यांच्या काचाला काळी फिल्मही लावून घेतली. सांगवी गावातील गजनान ऊर्फ गज्जू सावंत याच्या माध्यमातून रियांशवर लक्ष ठेवण्यात आले. ता.नऊ व दहा सप्टेंबर रोजी दोनदा प्रयत्न केला. पण तो फसला.

पण ता. ११ सप्टेंबर रोजी मात्र रियांश घरातून बाहेर येताच त्याचे अपहरण करण्यात आले. एका कारमध्ये घालून रात्री त्याला वडजी (ता.औसा) येथे नातेवाईकच्या एका शेतातील शेडमध्ये ठेवले. तेथे एक आजी होती. दुसऱ्या दिवशी नातेवाईक शेतात आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. मुलाला तातडीने येथून नेण्यास त्यांनी केरबा सांगितले. हे प्रकरण आपल्या अंगलट येत असून पोलिस तपास घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर या मुलाला या चौघांनी चाटा (ता.लातूर) येथे आणून सोडले. गुन्हा केल्यानंतर या संशयित आरोपींनी सावंत कुटुंबियांकडे ५० लाखांची मागणी केली नव्हती, अशी माहितीही समोर आली आहे. पण त्यासाठीच त्यांनी हे अपहरण केले होते.

या गुन्ह्यात वापरलेली कार व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे, अशी माहिती श्री. जाधव यांनी दिली. आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सिद्धेश्वर जाधव व सुधीर कोळसुरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच सहायक पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड, श्री. जाधव, श्री. कोळसुरे, बालाजी जाधव, राजू मस्के, नितीन कठारे, सचिन मुंडे, सायबरचे राजेश कंचे, प्रशांत स्वामी यांनी तपासात सहकार्य केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top