पेट्रोल, डिझलची चोरी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड; सहा जण अटकेत

3crime_201_163
3crime_201_163

औरंगाबाद : चालक आणि क्लिनरला हाताशी धरून हिंदुस्थान पेट्रोलियमच्या टँकरमधून पेट्रोल, डिझेलची चोरी करणाऱ्या रॅकेटचा पोलिस आयुक्तांच्या पथकाने बुधवारी (ता. २८) भांडाफोड केला. पथकाने सहा जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून डिझेल टँकरसह स्कॉर्पिओ, सहा मोबाइल आणि ५० हजारांची रोख रक्कम जप्त केली. दौलताबाद परिसरातील जांभाळा गावाजवळ असलेल्या एका ढाब्याच्या पाठीमागे पेट्रोल व डिझेलच्या टँकरमधून पेट्रोल व डिझेल चोरी करून त्याची विक्री करणारे रॅकेट कार्यरत असून या रॅकेटमध्ये टँकर चालक आणि क्लिनर देखील सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यावरून सहायक निरीक्षक राहुल रोडे, अनिल खरात, मनोज विखनकर, विठ्ठल आडे, विजय निकम, इमरान पठाण, सय्यद शकील, विनोद पवार आदींच्या पथकाने बुधवारी दुपारी चारच्या सुमारास त्रिमूर्ती ढाब्याच्या पाठीमागील अड्ड्यावर छापा मारला. यावेळी टँकरमधून (एमएच-२०-डीई-६१९५) मोटारीच्या साहाय्याने डिझेल व पेट्रोल काढण्यात येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी आडगाव येथील टँकर चालक शेख अब्दुल्ला शेख अहेमद (वय ४५) याच्यासह क्लिनर अशपाक हुसेन, साजेद खॉन साहेब खॉन (३० रा. कैसर कॉलनी), इलियास खॉन आजम खॉन (५४), शेख जाहेद शेख हमीद शेख (२६, बायजीपूरा), मुक्तार वजीर शेख (४०, बालानगर, पैठण) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून टँकरसह स्कॉर्पिओ (एमएच-१६-आर-५०२३), रिकामे ड्रम, प्लास्टीकच्या कॅन असा एकूण ४० लाख ११ हजार ५२३ रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले.

पेट्रोल पंप संघटनेच्या अध्यक्षालाच चुना
ज्या टँकरमधून पेट्रोल काढण्यात येत होते तो टँकर औरंगाबाद पेट्रोल पंप चालक, मालक संघटनेचे अध्यक्ष अखिल अब्बास यांच्या मालकीचा आहे. इंधन चोरणारी टोळी संघटनेच्या अध्यक्षांनाच चुना लावत होती. या बाबत अखिल अब्बास यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही़.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com