माणुसकीला काळिमा फासणारी घटना, औरंगाबादजवळ जादूटोण्याच्या संशयावरून अपंग व्यक्तीस दगडाने ठेचून मारले

संतोष शेळके
Wednesday, 28 October 2020

तू माझ्यावर जादूटोणा व करणी केली असे म्हणत एका ४८ वर्षीय अपंग व्यक्तीस त्याच्याच कुबडीच्या साहाय्याने व दगडाने ठेचून जबरी मारहाणी केली. यात अपंग व्यक्तीचा मृत्यू झाला.

करमाड (जि.औरंगाबाद) : तू माझ्यावर जादूटोणा व करणी केली असे म्हणत एका ४८ वर्षीय अपंग व्यक्तीस त्याच्याच कुबडीच्या साहाय्याने व दगडाने ठेचून जबरी मारहाणी केली. यात अपंग व्यक्तीचा मृत्यू झाला. जालना महामार्गावर हिवरा फाट्याजवळील दर्गा परिसरात बुधवारी (ता.२८) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. ज्ञानेश्वर आसाराम गडकर ( वय ४८, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) असे मृत अपंग व्यक्तीचे नाव आहे. यात मारहाण करणारा आरोपी भाऊसाहेब सदू शेजवळ (वय ४५, रा. कुंभेफळ ता.जि.औरंगाबाद) यास पोलिसांनी अटक केली आहे.

मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच आईने सोडला प्राण, एकाच सरणावर दोघांचे अंत्यसंस्कार

जालना महामार्गालगत हिवरा फाट्याच्या जवळील हॉटेल रामजीसमोर सैलानी बाबांचा दर्गा आहे. बुधवारी  सकाळी शेजवळ दर्ग्यावर दर्शन घेऊन थांबला असताना गडकर हे ही तेथे दर्शनासाठी आले होते. यावेळी शेजवळ याने गडकरांना तू माझ्यावर जादूटोणा व करणी केल्याचे सांगून वाद घातला. दोघांत वाद सुरू असतानाच शेजवळ याने श्री.गडकर यांचीच कुबडी हिसकावून घेत तिनेच त्यांना मारहाण केली. कुबडी तुटल्यानंतर दगडाने ठेचले. यात ज्ञानेश्‍वर गडकर रक्तबंबाळ होऊन जागेवरच कोसळले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. तत्परतेने जखमीला औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, मोठा रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एकास दहा वर्षे सक्तमजुरी, सहा हजार रुपये दंड

मृत गडकर हे सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. ते अपंग असुनही स्वतः रिक्षा चालवत, तर पत्नी चिकलठाणा येथे गिरणी चालवतात. त्यांच्या पश्चात पत्नी, आई , एक मुलगी व दोन मुली आहे. शवविच्छेदनानंतर बुधवारी दुपारी साडेचार वाजता मृतदेह करमाड पोलिसांनी नातेवाईकांकडे सुपुर्द केल्यानंतर चिकलठाणा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री श्री.गडकर यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून करमाड पोलिस ठाण्यात आरोपी भाऊसाहेब शेजवळ याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी शेजवळ हा मागील कित्येक वर्षांपासुन जादुटोण्यासारख्या आजाराने खरोखरच त्रस्त असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. तो कित्येक वर्षांपासून नेहमीच या ना त्या देवस्थानाच्या ठिकाणी महिनो महिने बैठका देतात. दरम्यान, यातुनच कित्येकदा त्यांची मानसिक स्थितीही बिघडलेली दिसून आल्याचे कुंभेफळ येथील काही ग्रामस्थांकडुन कळाले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handicapped Person Murdered Near Aurangabad Over Superstition