दक्षिणेसारख्या मोठ्या रुग्णालयांची मराठवाड्यात गरज : डॉ. संजय पटणे 

मनोज साखरे
Thursday, 17 September 2020

महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात सरासरी आजाराने होणारा मृत्युदर जास्त आहे. हेल्थ इक्विपमेंटबाबत मराठवाडा मागेच आहे. औरंगाबाद वगळता मराठवाड्यातील इतर तालुक्यांत कॅन्सरवरील सुविधा, हृदयाच्या आजाराबाबतच्या सुविधा, प्रगत वैद्यकीय उपकरणांची कमतरता जाणवतीय, असे मत फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय पटणे यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. 

दक्षिण भारतात रुग्णालय स्थापनेसाठी आंध्र, तामिळनाडू शासनाने प्रोत्साहनपर योजना केलेल्या आहेत, तसे महाराष्ट्रात नाही. मराठवाड्यातील परिस्थिती तर विदारक आहे. दक्षिणेत मोठमोठी स्पेशालिटी, खासगी रुग्णालये आहेत. सरकारी आरोग्य क्षेत्रावरील ताण यामुळे बराचसा कमी होतो. दक्षिणेत डोळ्यांची शस्त्रक्रिया व लॅप्रोस्कोपिक सर्जरीसाठी प्रसिद्ध आहे. प्रगत तंत्र, प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्यापेक्षा सरस आहे. म्हणूनच आपल्याकडेही दक्षिणेसारख्या मोठ्या रुग्णालयांची गरज आहे. त्यामुळे सरकारी आरोग्य क्षेत्रावरील ताण कमी होऊन रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळतील, अशी निरीक्षणे फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय पटणे यांनी मांडली. 

मराठवाडा वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिला आहे. आपल्याकडे जे दुर्लक्ष झाले, त्याचा परिणाम म्हणून मराठवाड्यात मोठ्या शहरांतही पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे मोठे खासगी हॉस्पिटल्स अथवा आरोग्य सेवा या प्रगत राहिलेल्या नाहीत. मोठे दवाखाने व उपचारासाठी आजही लोकांना पुणे, मुंबईकडे जावे लागते. मराठवाड्यात रुग्णांचा बेस मोठा आहे; परंतु म्हणाव्या तशा सुविधा नाहीत. कर्करोग रुग्णालय होण्यासाठी मराठवाड्याला कित्येक वर्षे वाट पाहावी लागली. महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात सरासरी आजाराने होणारा मृत्युदर जास्त आहे. हेल्थ इक्विपमेंटबाबत मराठवाडा मागेच आहे. औरंगाबाद वगळता मराठवाड्यातील इतर तालुक्यांत कॅन्सरवरील सुविधा, हृदयाच्या आजाराबाबतच्या सुविधा, प्रगत वैद्यकीय उपकरणांची कमतरता जाणवेल. 

शासनाने सोशल डिस्टन्सिंग व काही सांगितलेले दंडक गांभीर्याने न घेतल्याने मराठवाड्यात कोविड विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढला. अपुऱ्या वैद्यकीय सेवा, वाढलेली रुग्णसंख्या यामुळे सर्व भार शहरातील रुग्णालयांवर येत आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांत जागा नाही. याउलट ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा प्रगत नाहीत. त्या प्रगत असत्या तर शहराकडे येणारा लोंढा कमी झाला असता. ग्रामीण व तालुका पातळीवर वैद्यकीय सेवा सक्षम करण्याची गरज आहे; अन्यथा ग्रामीण रुग्णांना जिल्ह्यातील रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागेल. 

या गोष्टींची मराठवाड्यात गरज 

  • मराठवाड्यातील ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचे जाळे उभारले तर लोकांना चांगली सुविधा मिळू शकेल. 
  • दक्षिणेतील मोठमोठे स्पेशालिटी, खासगी रुग्णालयांसारखी रुग्णालये उभारण्याची गरज, परिणामी सरकारी आरोग्य क्षेत्रावरील ताण यामुळे बराचसा कमी होतो. 
  • दक्षिणेत टेक्नॉलॉजी, शास्त्र डेव्हलप केले आहे. त्या तंत्राचा तेथे वापर होतो. तसे प्रशिक्षित मनुष्यबळ व अद्ययावत इक्विपमेंटची गरज मराठवाड्यात आहे. 
  • मराठवाड्यात रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. शासनाने प्रोत्साहनात्मक गोष्टी केल्यास वैद्यकीय सुविधांत ती भर असेल. 
  • उद्योगासाठी सवलतीत एमआयडीसीत जागा मिळते तशी रुग्णालय उभारणीसाठी मिळायला हवी. परिणामी मोठी रुग्णालये मराठवाड्यात उभी राहतील. 
  • रुग्णालय उभारणीसाठी मोठे भांडवल लागते. त्यामुळे इक्विपमेंटवर अधिक लक्ष देता येत नाही. सरकारने सवलती दिल्या तर प्रगत तंत्रज्ञान, मनुष्यबळावर खर्च करता येऊ शकेल. याचा रुग्णांना मोठा फायदा होईल. 
  • बरेच विद्यार्थी डॉक्टर होऊन मराठवाड्यापेक्षा मुंबई, पुणे येथे स्थायिक होण्यास प्राधान्य देतात. मराठवाड्यात मोठी संधी मिळाल्यास गुणवत्ता येथेच नांदेल. 

(संपादन- प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Physicians Association President Dr. Sanjay Patne Opinion on health in Marathwada