संचारबंदीतही जश्न- ए- शादी : पोलिस अचंबित 

अनिल जमधडे
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोनाची ना भिती ना भय

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. संपुर्ण देशात संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. रस्‍त्यावर फिरु नका असे वारंवार सांगण्यात येत आहे. पोलिस नागरिकांना रस्‍त्यावर फिरकु देत नाही, अशा या काळात बुधवारी (ता. २५) सकाळी आझाद चौकात लग्नाला निघालेले वऱ्हाड पाहुन पोलिसांनी डोक्यावर हात मारुन घेतला. अखेर समजुत घालत वऱ्हाडी कुटुंबीयांना पोलिसांनी परत पाठवले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृत्यूचा संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्य शासन सतर्क झाले आहेत. सतर्कतेचा भाग म्हणूनच संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सातत्याने प्रसार माध्यमांसमोर येऊन घरात राहण्याचे आवाहन करत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे सातत्याने कोरोनाच्या संदर्भात होणारे अपडेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. असे असतानाही नागरिकांना अद्यापही कोरोनाचे गांभीर्य लक्षात आलेले दिसत नाहीत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आझाद चौकात पोलिसांचा बंदोबस्त 

बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आझाद चौकात जिन्सी पोलिसांचा बंदोबस्त सुरू होता. दुचाकीवरून विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना पोलीस हुसकाऊन लावत होते. अशातच काही वेळात एकापाठोपाठ विवाहाचे स्टिकर्स लावलेली तीन वाहने चौकामध्ये आले. महिला लहान मुले वृद्ध नागरिक अशा सर्व प्रकारचा प्रवाशांचा भरणा असलेले हे कुटुंबीय विवाह समारंभासाठी निघालेले होते. पोलिसांनी तातडीने तीनही गाड्या थांबविल्या तेव्हा सहाब हम शादी को जा रहे है, हम कुछ बहार घुमेंगे नही, असे सांगत या कुटुंबीयांची स्वतःची सुटका करून घेण्याची धडपड सुरू केली. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शीदी कैसे रुकेगी

पोलिसांनी त्यांना सर्व परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला, कोरोना संसर्ग हा नागरिकांच्या एकत्र येण्यामुळे अधिक प्रमाणात पसरू शकतो हे पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही या कुटुंबीयांनी पोलिसांनीच सांगितले,  सहाब हम अगर नही गये, तो शादी तो होने ही वाली है ना फिर हमे क्यू रोखते है असा उलट सवाल केला. त्यावर या कुटुंबियांचे शब्द ऐकून पोलिसांनी डोक्यावर हात मारून घेतला. अखेर पोलिसांनी त्यांना परत पाठविले, मात्र पोलिसांनी या मार्गाने जाऊ दिले नाही, तरीही दुसऱ्या मार्गाने जाता येईल का अशी कुजबुज करत हे कुटुंब परत निघून गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Bandobast News Aurangabad