धक्कादायक, या कारणांनी खालावत आहे सर्वांच्याच शुक्राणूंची गुणवत्ता!

योगेश पायघन
Tuesday, 21 January 2020

ज्या हवेमध्ये श्वास घेतो त्यात तांबे, जस्त, शिसे आदींपासून बनलेले कणयुक्त पदार्थ असतात. अशा विषारी हवेच्या श्वासोच्छ्वासामुळे शुक्राणूंचा ऱ्हास होतो आणि शुक्राणूंची संख्या इतकी कमी होते की, ती गर्भवती होण्यासाठी अडचणी येत असल्याचे डॉ. पवन देवेंद्र यांनी सांगितले.

औरंगाबाद - वायुप्रदूषणाचे आरोग्यासंबंधीचे धोके सर्वश्रुत आहेत. त्यामुळे प्रजनन समस्याही निर्माण होतात. प्रदूषित हवेमध्ये प्राणवायू (ऑक्‍सिजन) कमी असतो. त्यामुळे शुक्राणूंचे नुकसान होऊ शकते. शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होत नसला तरी तुम्ही जर दीर्घकाळ प्रदूषणाच्या संपर्कात राहिलात तर शुक्राणूंची गुणवत्ता खालावते, असे मत 'आयव्हीएफ' तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कमी होत जाणाऱ्या वायू गुणवत्ता निर्देशांकामुळे (एक्‍यूआय) केवळ फुप्फुसीय प्रणाली, हृदय आणि डोळे यांवरच दुष्परिणाम होतो, असे नाही. पुरुषांतील हार्मोनल बदलही चिंतेचा विषय ठरत आहे. महिलांचे प्रजनन आरोग्यही प्रदूषित हवेमुळे धोक्‍यात आले आहे. अंडे विकसित करणाऱ्या अंडाशयातील कोषांवर प्रदूषणाचा विपरीत परिणाम होतो. जास्त काळ वायुप्रदूषणाचा धोका असेल तर यामुळे केवळ फॉलिकल्सच्या गुणवत्तेमध्येच नव्हे, तर अंड्याच्या अनुवांशिक बनावटीतही समस्या उद्‌भवू शकतात, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा - नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

यामुळे होतो शुक्राणूंचा ऱ्हास
नायट्रोजन डायऑक्‍साईड आणि सल्फरडाय ऑक्‍साईडचा समावेश असलेली प्रदूषके प्रजननासाठी घातक ठरतात. हा परिणाम गर्भपाताशीदेखील संबंधित ठरतो. ज्या हवेमध्ये श्वास घेतो त्यात तांबे, जस्त, शिसे आदींपासून बनलेले कणयुक्त पदार्थ असतात. अशा विषारी हवेच्या श्वासोच्छ्वासामुळे शुक्राणूंचा ऱ्हास होतो आणि शुक्राणूंची संख्या इतकी कमी होते की, ती गर्भवती होण्यासाठी अडचणी येत असल्याचे डॉ. पवन देवेंद्र यांनी सांगितले.

वायुप्रदूषणाच्या सभोवतालच्या पातळीच्या अतिजास्त संपर्कात आल्यास जन्माच्या वेळी अतिकमी वजन, वाढमंदता, अकाली प्रसूती, नवजात अर्भक मृत्यू उद्‌भवतात. प्रदूषण पूर्णपणे टाळता येत नसले तरी जीवनशैलीत काही बदल आणि आहार नियंत्रणाने गर्भधारणेसाठी शुक्राणूंची संख्या आदर्श ठेवण्यास मदत होते. जीवनसत्त्वे, खनिजे आणि समृद्ध पौष्टिक घटक, अँटीऑक्‍सिडंटचे वाढते सेवन शरीरासाठी संरक्षण यंत्रणेसारखे कार्य करते.
- डॉ. पवन देवेंद्र, "आयव्हीएफ' तज्ज्ञ

हेही वाचा - चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pollution is causing fertility dangerous to health