सहायक फौजदाराच्या सुनेची आत्महत्या नव्हे हत्याच! शवविच्छेदन अहवालानंतर चौघांवर वाढविण्यात आले कलम

सुषेन जाधव
Tuesday, 8 December 2020

बीड बायपास रस्त्यावरील अबरार कॉलनीत राहणाऱ्या सहायक फौजदाराच्या सुनेचा (कुलसूम) तीन महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. दरम्यान तिचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला होता.

 औरंगाबाद : बीड बायपास रस्त्यावरील अबरार कॉलनीत राहणाऱ्या सहायक फौजदाराच्या सुनेचा (कुलसूम) तीन महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. दरम्यान तिचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला होता. सातारा पोलिसांनी घटनेच्या दोन दिवसांनंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता, मात्र, कुलसूमने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याने तिचा सासरा सहायक फौजदार समिउद्दीन चिरागोदिन सिद्दीकी, पती अनिसोद्दीन सिद्दीकी, सासू आशा सिद्दीकी, दिर दानिश सिद्दीकी (सर्व रा. अबरार कॉलनी, सातारा परिसर)यांच्या विरूध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

BharatBandh : औरंगाबाद शहरातील अर्धेअधिक व्यापारी आस्थापना राहणार बंद

बीबी कुलसूम अनीसोद्दीन सिद्दीक्की (२७, रा. अबरार कॉलनी, सातारा परिसर) या महिलेचा ५ अक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. ती सहा महिन्यांची गर्भवती होती, तिच्या माहेरच्या नतेवाईकांनी मृतदेह पाहिला असता तिच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. म्हणून माहेरकडील मंडळीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता, शिवाय या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. सासरा हा पोलीस दलात सहायक फौजदार असल्याने पोलीस आमची तक्रार घेत नाही, जोपर्यंत या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भुमिका माहेरच्या मंडळीनी घेतली होती मात्र, पोलिसांनी समजूत काढून मृतदेह सुपूर्द केला होता, त्यानंतर ८ ऑक्टोबरला या गुन्ह्यात विवाहितेच्या वडीलांची तक्रार घेऊन या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.दरम्यान, प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिपाली निकम या सदर प्रकरणाचा तपास करत आहेत.

अहवालानुसार...
शवविच्छेदन अहवालानुसार बीबी कुलसूम हिच्या गळ्यावर कठीण वस्तूचा दाब दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर सातारा पोलिसांनी या प्रकरणात ३०२ चे कलम वाढविले आहे. या गुन्ह्यात मयत महिलेचा पती अनिसोद्दीन सिद्दीकी हा अटकेत असून सासरा समिउद्दीन चिरागोदिन सिद्दीकी, सासू आशा सिद्दीकी, दिर दानिश सिद्दीकी (सर्व रा. अबरार कॉलनी, सातारा परिसर) हे फरार आहेत. प्रकरणात सासू आशा सिद्दीकीला अटकपूर्व जामिन मिळावा म्हणून उच्च न्यायालय खंडपीठात अर्ज सादर करण्यात आला होता, यावर सोमवारी(ता.७) सुनावणी झाली असता खंडपीठाने जामिन अर्ज फेटाळला.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PSI Daughter In Law Not Committed Suicide But Murder Aurangabad News