पोटाला चिमटा घेत खरिपाची पेरणी, पण पावसामुळे पिके गेली हातातून

सचिन चोबे
Sunday, 20 September 2020

सिल्लोड तालुक्यात वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहेत.

सिल्लोड (जि.जालना) : निसर्गाच्या लहरीपणाने क्षणार्धात होत्याचे नव्हते केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला गेला. शनिवारी (ता.१९) रात्रीच्या सुमारास सिल्लोड तालुक्यात झालेल्या तासभर वादळीवाऱ्यासह पावसाने अनेक गावांतील खरिपाची उभी पिके जमीनदोस्त झाली.

गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी हतबल झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ ठप्प झाली, शेतमालास भाव नाही. पोटाला चिमटा घेत खरिपाची पेरणी केली. पीक काढणीला येत असतांनाच झालेल्या वादळीवारे व पावसाने पीके हातची गेली आहे.

पिकांचे नुकसान झाल्याचे पाहून शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास उभारी द्यावी तरी कोठे-कोठे असा प्रश्न निर्माण होत आहे. मागील वर्षी देखील परतीच्या पावसाने शेतमाल हातचा गेला. शासनाने तोडकी मदत केली, तर हक्काच्या पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. पावसाने देखील सुरवातीपासून तालुक्यात कहर केला आहे. गेल्या महिन्यांतच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, आता नुकसानीच्या सुरू असलेल्या पावसाने देखील होत्याचे नव्हते केले आहे.

निसर्ग कोपला
तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर्व हंगामी मिरची लागवड होते. सुरवातीपासून झालेल्या पावसामुळे मिरचीच्या उत्पन्नास फटका बसला. नगदीचे पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करतात. परंतु यावर्षी लागवड कमी झाल्याने व उत्पादनात घट झाल्याने भाव चांगला मिळत होता. मात्र त्यावरही गेल्या महिनाभरापासून कोकडा रोगाचा मिरचीचे पीक देखील हातचे गेल्याने शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडले आहे. त्यात आता शेतकऱ्यांना आशा लागलेल्या मका, कपाशी देखील फटका बसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Damaged Crops, Farmers In Trouble Aurangabad News