गरीबांना रेमडेसिवीर २,३६० रुपयात मिळणार, कोरोना चाचणीचे वाढणार प्रमाण

मधुकर कांबळे
Tuesday, 20 October 2020

औरंगाबाद  जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोचले आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहीमेच्या सर्वेक्षणातून विविध आजारांची लक्षणे असलेल्या एक लाख लोकांची माहिती प्राप्त झाली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोचले आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहीमेच्या सर्वेक्षणातून विविध आजारांची लक्षणे असलेल्या एक लाख लोकांची माहिती प्राप्त झाली आहे. त्या लोकांच्या प्राधान्याने तातडीने आटीपीसीआर चाचण्या करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

नोकरीचे अमिष दाखवून २२ लाख रुपयांची फसवणूक, संस्थाचालक पिता-पुत्राला अटक

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत सोमवारी (ता.१९) झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी ही माहिती दिली. खासदार इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाठ, अतुल सावे, अंबादास दानवे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. जिल्ह्‍यात रेमडेसिवीर इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. खासगी दवाखाण्यात दाखल गरीब रुग्णांना अन्न औषध प्रशासनामार्फत २,३६० रूपये या सवलतीच्या दरात हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. लोकप्रतिनिधींनी खासगी रुग्णालयामधून कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांवर तसेच देयकांवर नियंत्रण ठेवण्याचे सूचित केले.

CoronaUpdate : औरंगाबादेत नवे ११३ रुग्ण, उपचारानंतर बरे झालेल्या १८८ जणांना सुटी

सर्व एटीएम सेंटरचे निर्जतुकीकरण करावे. तसेच मास्क वापराबाबत मनपा, पोलीसांनी कडक कारवाई करावी, जेणेकरुन नागरीकांमध्ये मास्क वापराचे प्रमाण वाढेल, असे सूचित केले. तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करुन शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य मिळण्यासाठी त्याचा अहवाल वेळेत शासनाला सादर करावा तसेच विमा कंपन्यांनाही त्याबाबत वेळेत कळवावे, असे सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींनी सूचित केले.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के
अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून रुग्णालयात दाखल रुग्ण संख्याही कमी होत आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून सध्या एकूण २६३७ रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत. घाटीत ९९८, महापालिकेकडे २६० आणि जिल्हा रुग्णालयात १३७९ इंजेक्शन उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते असून ९०.६९ टक्के आहे तर मृत्यूदर २.६७ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या १०१११७ तर ॲण्टीजन चाचण्या २७९०१४ अशा एकुण ३८०१३१ इतक्या झाल्या आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी यावेळी दिली.

इंजेक्शन हवे असल्यास हे करावे लागेल
शहरात घाटी रुग्णालयातील एमएससीएफएस संचालित प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र व हडकोतील बळीराम पाटील शाळेजवळील अर्बन बझार अशा दोन ठिकाणी सवलतीच्या दरातील इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत असे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले. सवलतीच्या दरात इंजेक्शन हवे असलेल्या संबंधितांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे जाऊन आधारकार्ड, रेशनकार्डची प्रत द्यावे लागेल व इंजेक्शन हवे असल्याबाबत खात्री करून घ्यावी लागणार आहे. त्यांच्या पत्रानंतरच संबंधित ठिकाणी त्यांना सवलतीच्या दरात इंजेक्शन मिळणार आहे. त्यासाठीही निकष ठरवून देण्यात आले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remdisivar Injection Poor Patients Will Get On Two Thousand 360 Rupees