परतीचा जोरदार पाऊस, औरंगाबाद शहरात अनेक भागात नाल्याचे पाणी शिरले घरात

Paus1
Paus1

औरंगाबाद :  काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. नऊ) पुन्हा एकदा तडाखेबाज हजेरी लावली. दुपारी तीनच्या सुमारास तासभर धो-धो कोसळलेल्या पावसाने जुन्या शहरात नागरिकांची त्रेधा उडविली. नाल्याचे पाणी औषधीभवन शेजारील घरात शिरले तर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने त्यातून वाट काढताना वाहनचालकांना धडकी भरली. निराला बाजार भागात झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले.


शहर परिसरात काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे ऑक्टोबर हीटने नागरिक बेजार झाले होते. शुक्रवारी उकाडा प्रचंड जाणवत होता. त्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहेच. दुपारी तीनच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून विजेचा कडकडाटही सुरू होता. तासभर मुसळधार पाऊस झाल्याने शहरवासीयांची तारांबळ उडाली. रस्त्यावर सर्वत्र गुडघाभर पाणी होते. नाले काठोकाठ भरल्याने हे पाणी तुंबले व काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली.

पावसामुळे औरंगपुरा, समर्थनगर, खडकेश्वर, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज, रोषणगेट, कटकटगेट, किराडपुरा, जाफरगेट, जुना मोंढा, निराला बाजार, दलालवाडी, पैठणगेट, सिल्लेखाना, क्रांती चौक, अजबनगर, खोकडपुरा तसेच सिडको-हडकोसह जयभवानीनगर, रामनगर, विठ्ठलनगर, चिकलठाणा, गारखेडा, शिवाजीनगर, उल्कानगरी, सहकार कॉलनी, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, वीटखेडा भागात जनजीवन विस्कळित झाले. रस्त्यावर व सखल भागात पाणीच पाणी झाले. पाऊस थांबल्यानंतर पाणीपातळी कमी झाली. या पावसात सरस्वती भुवन महाविद्यालयासमोर बसस्थानकाजवळील झाड कोसळले. त्याखाली अनेक वाहने दबल्याने नुकसान झाले.

तळघर गेले पाण्यात
औषधी भवनचा नाला चोकअप झाल्याने परिसरातील घरात नाल्याचे पाणी शिरले. कैलास नावंदर, मुन्ना तोतला, सुधारक गाडेकर, किशोर जांगडे यांच्या तळघरात गुडघाभर पाणी होते. त्यात संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. घरातील सदस्यांनी घाबरून दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली. दलालवाडी भागातील घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले. अर्जुन गाडेकर, करण गाडेकर या भावांनी पुरात अडकलेल्या अनेकांना मदतीचा हात दिला.

सातारा-देवळाईला फटका
सातारा-देवळाई परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. नाल्यांना पूर आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. सर्वत्र पाणी साचल्याने या भागाला तलावाचे स्वरूप आले होते.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com