सतीश चव्हाण यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ; मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवारांनी केले अभिनंदन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झालेले महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी आज मंगळवारी (ता.आठ) विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झालेले महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी आज मंगळवारी (ता.आठ) विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विधानसभा  सभापती नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची उपस्थिती होती. राज्यातील पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका जागेसाठी १ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली. धुळे-नंदुरबारची एकमेव जागा वगळता इतर ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. मराठवाडा पदवीधर मतदारंसघ राष्ट्रवादी काँग्रेसने तिसऱ्यांदा राखला. सतीश चव्हाण यांनी विक्रमी ५८ हजारांचे मताधिक्य घेत या मतदारसंघातून भाजपचे शिरीष बोराळकर यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. शिवसेना- काँग्रेस या दोन आघाडीतील पक्षाची ताकद चव्हाण यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल्यामुळे चव्हाण यांचा मोठा विजय झाल्याचे बोलले जाते.

मतदार नोंदणीसाठी घेतलेली मेहनत, नियोजनबद्ध पद्धतीने केलेला प्रचार आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करवून घेण्यात आलेले यश याचा परिणाम सतीश चव्हाण यांच्या विजयाच्या रुपाने दिसून आला होता. सतीश चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी राबवलेल्या रणनितीचे कौतुक खुद्द शरद पवारांनी देखील केले. विक्रमी मतांनी विजय झाल्यामुळे जबाबदारी वाढली असून आता पदवीधर आणि सर्वसामान्याची कामे करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा, असा सल्ला देखील पवारांनी चव्हाण यांना विजयानंतरच्या भेटीत दिला होता. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी चव्हाण यांना शपथ दिल्यानंतर  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,अजित पवार, उपसभापती .नीलम गोऱ्हे आदींनी सतीश चव्हाण यांचे अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satish Chavan Take Oath Membership Of Legislative Council Aurangabad News