esakal | आयपीएलच्या सामन्यावर सट्टा, काचीवाडा भागात बुकी पिता-पुत्र ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

arrest11111_2017082746

आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकी पिता-पुत्राला पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा घालून ताब्यात घेतले.

आयपीएलच्या सामन्यावर सट्टा, काचीवाडा भागात बुकी पिता-पुत्र ताब्यात

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंंगाबाद : आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकी पिता-पुत्राला पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा घालून ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (ता.१९) मध्यरात्री काचीवाडा भागात करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नेमीचंद शांतीलाल कासलीवाल (वय ४८), आकाश नेमीचंद कासलीवाल (वय २२, दोघेही रा. काचीवाडा परिसर) अशी संशयित पिता-पुत्रांची नावे आहेत. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

चोरीचा माल विकायला आले अन् जाळ्यात अडकले, तीनपैकी दोन कुख्यात गुन्हेगार

सोमवारी आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स या दोन संघात सामना झाला. सामना सुरू झाल्यानंतर काचीवाडा भागात आयपीएल सामन्यावर दोन बुकी सट्टा घेत असल्याची माहिती पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाला मिळाली होती. यानंतर पथकाने छापा घातला. त्यावेळी नेमीचंद कासलीवाल व आकाश कासलीवाल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेताना दिसून आले. पोलिसांच्या पथकाने त्यांच्याजवळून एक पॅड हस्तगत करून तपासला. तेव्हा त्यामध्ये सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तब्बल १६६ जणांची यादी आढळली.

पोलिसांनी कासलीवाल पिता-पुत्राच्या ताब्यातून आठ मोबाईल, एक कॅलक्युलेटर, एक पॉवरबँक, इंटरनेट कनेक्शनचे राऊटर, सात मोबाईल चार्जर, एक इलेक्ट्रीक बोर्ड असा एकूण ८० हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल रोडे, जमादार व्ही. आर. निकम, एम. आर. राठोड, व्ही. जे. आडे, एम. बी. विखणकर, ए. आर. खरात, व्ही. एस. पवार, दामिनी पथकाच्या पी. एम. सरससांडे, एस. एस. नांदेडकर, एस. जे. सय्यद यांनी केली.

Corona Update : औरंगाबादेत नवे १५६ रुग्ण, उपचारानंतर २१९ जणांना सुटी

८० लाखांचा व्यवहार!
कासलीवाल पिता-पुत्राच्या ताब्यातून जप्त केलेल्या डायरीची तपासणी झाली. त्यात सट्टा लावणाऱ्या जवळपास १६६ जणांची नावे व रकमा आढळल्या. सोमवारी दोन लाख ३८ हजार ४० रूपयांची उलाढाल झाली होती. आतापर्यंत आयपीएलच्या सामन्यावर ७० ते ८० लाख रूपयांची देवाण-घेवाण झाल्याचे आकडे पोलिसांना आढळले.

संपादन - गणेश पिटेकर