
सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबाद शहरातील पैठण गेट, औरंगपूरा, क्रांती चौक, खोकडपूरा या भागात सोमवारी (ता.१४) दुपारी दोनच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला.
औरंगाबाद : सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबाद शहरातील पैठण गेट, औरंगपूरा, क्रांती चौक, खोकडपूरा या भागात सोमवारी (ता.१४) दुपारी दोनच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वातावरणात गारवा आहे. त्यामुळे औरंगाबादकर बाहेर पडताना कानटोपी, स्वेटर यासह इतर ऊबदार कपडे घालून दैनंदिन कामे करताना दिसत आहेत. पैठण गेट, सेव्हन हिल या भागातील स्वेटर विक्रेत्यांकडून ऊबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी झालेली आहे.
रविवारीही (ता.१३) शहरातील काही भागात हलकासा पाऊस पडला होता. तसेच जिल्ह्यातील येसगाव, दिघी परिसरात जोरदार पाऊस झाला. आज सोमवारी पिशोर व परिसरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. या बदललेल्या वातावरणाचा रब्बी पिकांना फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. तापमानाचा पारा खाली आल्याने व सूर्यदर्शन नसल्याने वातावरणात गारवा आहे. चापानेरसह परिसरात सलग चौथ्या दिवशी ढगाळ वातावरण असून अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहे.
संपादन - गणेश पिटेकर