Diwali 2020 : दुसऱ्या दिवशीही झेंडुच्या फुलांचा दर शंभरीवरच, औरंगाबादेत ३८१ क्विंटलची आवक

प्रकाश बनकर
Sunday, 15 November 2020

यंदा दसऱ्याला दोनशे ते अडिचशे रुपयापर्यंत मजल मारलेल्या झेंडुच्या फुलांना दिवाळीत चांगला दर मिळाला. धनत्रयोदशीच्या दिवशी शहरात दिडशे ते दोनशे रुपये किलोने फुले विक्री झाली.

औरंगाबाद : यंदा दसऱ्याला दोनशे ते अडिचशे रुपयापर्यंत मजल मारलेल्या झेंडुच्या फुलांना दिवाळीत चांगला दर मिळाला. धनत्रयोदशीच्या दिवशी शहरात दिडशे ते दोनशे रुपये किलोने फुले विक्री झाली. तर शनिवारी (ता.१४) फुलांचा दर कायम होता. काही ठिकाणी शंभर रुपयांवर दर आला. मात्र शहरात फुलांची आवक कमी झाल्यामुळे हा परिणाम जाणवला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.दसरा-दिवाळी निमित्त झेंडुच्या फुलांना प्रचंड मागणी असते. दोन्ही सणानिमित्त झेंडूच्या फुलांचा मोठा मान असतो. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन, घरा-दाराला तोरणासाठी झेंडूच्या फुलांच्या हाराची आरास केली जाते.

Diwali2020 : डिजिटल जमान्यातही खतावण्याचे महत्त्व कायम, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर होते पूजा

अकोला, बुलडाणा,हिंगोला, परभणी येथून फुल विक्रेते शहरात येतात. शनिवारी बाजार समितीत केवळ ३८१ क्विंचल आवक झाली आहेत. यामुळे दरवाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.दिवाळीनिमित्त शुक्रवारी सांयकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर, चौकात फुल विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट, क्रांतीचौक, जवाहर कॉलनी, गारखेडा, शिवाजीनगर, सिडको बसस्थानक, जळगावरोड आदी ठिकाणी रस्त्याच्या कडेला फुलांचे ढिगारे लावून विक्री सुरु होती.

यंदा दसऱ्याला झेंडूच्या फुलांना चांगल्या प्रकारे भाव मिळाला, म्हणून शेतकर्‍यांनी दिवाळीसाठी बऱ्यापैकी खर्च केला. परंतु परतीच्या पावसाने फुल उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले. अनेकांची फुलशेती खराब झाली. त्यामुळे दिवाळीच्या वेळी झेंडूच्या फुलांची आवक घटली. तरी फुल बाजारात झेंडूची शंभर ते दीडशे रुपयेपर्यंत विक्री झाली. लक्ष्मीपूजनासाठी शेवंतीच्या फुलांना मागणी असल्याने दीडशे ते दोनश रुपये प्रमाणे विक्री झाली. सिटीचौक येथील होलसेल फुल बाजारात झेंडूच्या फुलांची ७० रुपये किलो प्रमाणे विक्री झाली. तर शेवंतीचे फुल १२० रुपये किलोप्रमाणे विक्री झाल्याची माहिती बाबूभाई यांनी दिली.

 

Edited -  Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second Day Marigold Flowers Price Above One Hundred Aurangabad News