esakal | Diwali2020 : डिजिटल जमान्यातही खतावण्याचे महत्त्व कायम, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर होते पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

Khatevahia

डिजिटल (संगणक) युगातही ग्रामीण भागात खतावण्यांचे महत्त्व कायम असून धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर व्यापारीवर्ग खातेवह्यांची विधिवत पुजा करून पुढील दिवाळीपर्यंतचे हिशोब लिहिण्यास त्याचा उपयोग करतात.

Diwali2020 : डिजिटल जमान्यातही खतावण्याचे महत्त्व कायम, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर होते पूजा

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : डिजिटल (संगणक) युगातही ग्रामीण भागात खतावण्यांचे महत्त्व कायम असून धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर व्यापारीवर्ग खातेवह्यांची विधिवत पुजा करून पुढील दिवाळीपर्यंतचे हिशोब लिहिण्यास त्याचा उपयोग करतात. अर्थात संगणक युगातही ग्रामीण भागातील खतावण्याचे महत्त्व कायम असल्याचे चित्र पाचोडसह (ता.पैठण) परिसरात पाहावयास मिळते. शासकीय कामकाजात एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष समजले जाते. परंतु व्यासायिक वर्गासाठी दिवाळी ते दिवाळी हे आर्थिक वर्ष ग्राह्य धरले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हिशोबासाठी लागणाऱ्या खतावण्या, कीर्द व खातेवह्यांचे पूजन करून नवीन आर्थिक वर्षारंभ करण्याची परंपरा व्यापारीवर्ग जोपासत आला आहे.

Lakshmi Puja Muhurat : आज लक्ष्मीपूजन; घरोघरी लगबग, व्यापाऱ्यांचे चोपडीपूजन

शहरात संगणकीय ज्ञान आत्मसात करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने शहरात सर्व व्यवहार संगणकाद्वारे पार पाडले जातात. व्यवसायाची वाढती व्याप्ती, त्वरित व अचूक माहितीसाठी संगणकाला विशेष प्राधान्य दिले जात असून शहरातील संगणकाला मिळालेल्या पसंतीमुळे खतावण्याचे महत्त्व कमी होऊन मुनिमांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली. परंतु ग्रामीण भागात संगणकाला फारशी पसंती नसून खतावण्यावर भर असल्याचे व्यापारी राजेश शेट्टी यांनी सांगितले.व्यापारीवर्गासाठी दिवाळी ते दिवाळी हे आर्थिक वर्ष ग्राह्य धरले जाऊन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी सर्व खतावण्यासाठी लागणाऱ्या खातेवह्या, कीर्द आदीची विधिवत “ पुरोहिता”च्या हस्ते पूजा करून त्यावर “कुंकू” ने स्वास्तिकचे चिन्ह काढले जाते.

या दिवशी विधिवत पूजा झालेल्या सर्व खाते वह्यांचे पुढील दिवाळीपर्यंत हिशोब लिहिण्यासाठी उपयोग केला जातो. काही दुकानदार, व्यापारी, खासगी सावकार 'लाल ' कापड लावलेले मोठे लेजर (रजिस्टर) खरेदी करतात, तर काहीजण पुठ्ठ्याच्या 'लाल ' खाते वह्या ज्यावर लक्ष्मी, सरस्वती, गणपतीची छायाचित्रे असलेल्या वह्या खरेदी करतात. बहुतांश व्यापाऱ्यांची पसंती लाल रंगाच्या मोठ्या “लेजर” सह लक्ष्मी, सरस्वती, गणपतीची छायाचित्रे, मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, तारखा, असलेल्या खातेवह्यास असल्याचे दुकानदार नितीनसेठ बडजाते यांनी सांगितले. धार्मिक महत्त्व म्हणून अनेकजण शहरातही संगणकासह खातेवह्यास महत्त्व देतात.

Diwali 2020 : दिवाळीचा जिवंत 'वसु बारस' देखावा, छायाचित्रकाराने दिला मराठमोळा लुक

मात्र दिवसेंदिवस वाढणारे कामगाराचे पगार लक्षात घेता मुनिमांची संख्या कमी करण्यावर सर्वांचे 'लक्ष्य' असल्याचे पाहवयास मिळते. एकंदरीत ग्रामीण भागातही व्यापारीवर्ग सुज्ञ व सुशिक्षित झाल्याने तो स्वतः खतावण्याचे कामकाज सांभाळत आहे. त्यामुळे मुनिमावर बेरोजगारीची कुऱ्हाडच कोसळल्याचे दिसून येते. दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारपेठांत विविध दुकानांवर “लेजर” लहान मोठ्या खतावण्याच्या खातेवह्या विक्रीस येऊन त्यांचे दर नियमितपेक्षा कडाडल्याचे व १०० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत “लेजर” व खातेवह्यांच्या किमती असून सर्वाधिक पसंती कापडी लाल रजिस्टर व देवदेवतांच्या (लक्ष्मी, सरस्वती व गणपतीच्या) छायाचित्र असलेल्या खातेवह्यास असल्याचे राजेश बडजाते यांनी सांगितले.ग्रामीण भागात खासगी सावकारी आजही बँकाच्या असहकार्य धोरणामुळे पाय रोवून आहे. खासगी सावकारी व्यवसाय करणारेही दिवाळीसणाच्या तोंडावर विविध रजिस्टर खरेदी करून लक्ष्मीपूजनाचे महत्व ओळखून त्याची पूजा करतात. आधुनिक युगातही खतावण्याचे अबाधित महत्व पाहून संगणकीय युगापासून आपण अलिप्त असल्याचे भासते. मोठ-मोठे जमीनदार सालगाड्यांचा हिशोब लिहिण्यासाठी खतावण्याचीच परंपरा जोपासत असल्याचे प्रगतशील शेतकरी प्रकाश निर्मळ यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर