जेष्ठ समीक्षक लेखक डॉ. सुधीर रसाळ यांना मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार

मनोज साखरे
Saturday, 13 February 2021

मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार यावर्षी औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक लेखक डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर झाला

औरंगाबाद: राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे ‘विंदा करंदीकर जीवनगौरव, श्री. पू. भागवत, मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक या चार पुरस्काराची घोषणा गुरूवारी (ता. ११) मुंबईत मराठी भाषा विभाग व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.

मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार यावर्षी औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक लेखक डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर झाला. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. रसाळ यांनी औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले. गत ६० वर्षांपासून ते मराठी भाषा, मराठी वाड्मय आणि मराठी संस्कृती या क्षेत्रात अविरत लेखन करीत आहेत.

'शिवजयंती निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील'

१९५६ पासून ते मराठी वाड्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे. मराठी भाषा वाड्मयाचे नामवंत शिक्षक यासह पत्रकारितेतील जाणकार म्हणून ते ओळखले जातात. सापेक्षी समीक्षक, मर्मग्राही विश्‍लेषक, संवेदनशिल सौंदर्यासक्त रसिक व शिस्तप्रिय अभ्यासक अशी स्वतःची प्रतिमा त्यांनी निर्माण केली. त्यांचा कविता आणि प्रतिमा हा ग्रंथ या क्षेत्रातील महत्वाचा मानला जातो. त्यांना मराठी भाषा दिनी हा पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

"पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच. परंतू गत कित्येक वर्षे अगदी बाराव्या शतकांपासून मराठीवर आक्रमण होत आहे. या आक्रमणातही मराठी टिकली. मराठीने ती आक्रमणे स्विकारली. मराठीचे संवर्धन, तीला ज्ञानभाषा करायची म्हणजे काय करायचे? मातृभाषेतच अस्सल लेखन करता येते यावर मी १६६० पासून सतत लेखन करीत आहे. कदाचित हे लेखन विचारात घेऊन मला पुरस्कार मिळाला असे मला वाटते"- डॉ. सुधीर रसाळ

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Critic Writer Sudhir Rasal Marathi Language Scholar Awarded