शिवसेनेने भगवा सोडला, आमच्या रक्तात भगवा

माधव इतबारे
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

शिवसेनेने भगवा सोडल्याची प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी दिली तर आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये, आमच्या रक्तात भगवा आहे, असा पलटवार महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला आहे.

औरंगाबाद- मुख्यमंत्रिपदावरून युती तुटल्यानंतर एकमेकांवर टीका करण्याची संधी शिवसेना-भाजपचे पदाधिकारी सोडत नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता.31) उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर महापालिकेत शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडल्या. शिवसेनेने भगवा सोडल्याची प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी दिली तर आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये, आमच्या रक्तात भगवा आहे, असा पलटवार महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला आहे. 
मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपची युती तुटली. त्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते शिवसेनेवर रोज आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. शिवसेनादेखील तोडीस तोड उत्तरे देत आहे. हाच प्रकार स्थानिक पातळीवरही सुरू आहे. महापालिका निवडणुका तोंडावर आल्यामुळे भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी नवनवे विषय समोर आणत आहे. 

उपमहापौरपदाचा राजीनामा
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याचा आरोप करत भाजपचे विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आंदोलनही करण्यात आले. दुसरीकडे शिवसेनेने या योजनेला स्थगिती नव्हतीच असे सांगत तसे पत्र राज्य शासनाकडून आणले. दरम्यान, महापालिका सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा भाजपने केली; मात्र केवळ उपमहापौरपदाचाच राजीनामा दिला. अन्य पदावर भाजप पदाधिकारी कायम आहेत. ज्या पदाचा राजीनामा दिला त्याच पदासाठी पुरस्कृत उमेदवारही भाजपने दिला. 

बाण-खानासोबत
दरम्यान, या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष तनवाणी यांनी शिवसेनेचा बाण-खानासोबत गेल्याचा टोला लगावला. शिवसेनेचे भगवे फेटेही या निवडणुकीत दिसले नाहीत. जनतेला शिवसेनेचा खरा चेहरा दिसला, अशी टीका केली. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी राजीनामा भाजपची स्टंटबाजी होती, हे आता जनतेसमोर उघड झाले आहे. सभापतींसह प्रभाग समितीपदांचेही राजीनामे भाजपने द्यावेत, असे आव्हान भाजपला दिले. 

उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून अपक्षाला पाठिंबा दिला. आमची 31 मते होती. प्रत्यक्षात 34 पडली. निवडणूक गांभीर्याने लढविली नाही. सत्तेसाठी शिवसेना काय करू शकते, हे आम्हाला दाखवायचे होते. 
किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष भाजप 

महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडणारी भाजप सभापती, प्रभाग समितीपदाचेही राजीनामे का देत नाही. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून आम्ही ताकद दाखविली आहे. त्यामुळे भाजपने फुकटचा सल्ला देऊ नये. 
नंदकुमार घोडेले, महापौर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena left saffron, saffron in our blood