
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी प्राचार्य डॉ. श्याम शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी प्राचार्य डॉ. श्याम शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी पाठविलेले नियुक्तीपत्र विद्यापीठास बुधवारी (ता.२८) प्राप्त झाले. डॉ. प्रविण वक्ते यांच्याकडून ते प्र-कुलगुरुपदाची सुत्रे लवकरच स्वीकारतील.
डॉ. शिरसाठ हे मुळचे फुलंब्री (जि. औरंगाबाद) येथील आहेत. विवेकानंद महावि़द्यालयात प्राचार्यपदी कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातून तीन वर्षापुर्वी प्राध्यापकपदावरुन त्यांनी धारणाधिकार (लिन) घेतला आहे. लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच विद्या परिषदेचे सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.
डॉ. शिरसाठ यांना प्रशासकीय अनुभव आठ वर्षाचा आहे. तर संशोधन क्षेत्रात साडेचौदा वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात १२ पीएच.डी. संशोधकांनी तर, २९ एम.फील संशोधकांनी शोधप्रबंध सादर केले. त्यांनी नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, चीन याठिकाणी अभ्यासदौरे केले आहेत. आतापर्यंत त्यांची १६ पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. डॉ. अशोक तेजनकर यांनी २६ फेब्रुवारी २०१८ ते ३ जून २०१९ दरम्यान काम पाहिले. तर डॉ. वक्ते हे ६ ऑगस्ट २०१९ पासून प्रभारी प्र-कुलगुरुपदावर कार्यरत आहेत. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. जयश्री सुर्यवंशी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
संपादन - गणेश पिटेकर