विधानसभेत काही आमदार पैसे उकळण्यासाठी विचारतात प्रश्‍न, इम्तियाज जलील यांचा आरोप

ई सकाळ टीम
Wednesday, 23 December 2020

महाराष्ट्रातील काही आमदार हे विधानसभेत प्रश्‍न विचारुन अधिकारी व कंत्राटदारांकडून पैसे उकळतात, असा आरोप एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी (ता.२३) केला आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील काही आमदार हे विधानसभेत प्रश्‍न विचारुन अधिकारी व कंत्राटदारांकडून पैसे उकळतात, असा आरोप एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी (ता.२३) केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये जलील म्हणतात, की महाराष्ट्रातील काही आमदार हे विधानसभेत अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी प्रश्‍न विचारतात. हे सत्यस्थिती सर्वांना माहित आहे. पण मांजराच्या गळ्यात कोण घंटा बांधणार!

 

 

लोकप्रतिनिधींचे कशा पद्धतीने लागेबांध राजकारणात आहेत, हे सर्वश्रूत आहे. नेमके त्यावर जलील यांनी बोट ठेवले आहे. त्यांच्या आरोपाला विधानसभेचे सभापती कसा प्रतिसाद  देतात हे पाहण्यासारखे राहिल. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन गेले. मात्र त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली नाही. यावर बोलताना खासदार जलील म्हणाले होते, की योगी आदित्यनाथ यांनी सर्वात अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला हवी होती. उत्तर प्रदेशात जात, धर्म यावर मोठे राजकारण केले जाते. अशा प्रदेशात उद्योगपती कशी गुंतवणूक करतील असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला होता. आज बुधवारी त्यांनी दिल्लीच्या सीमेवरील सिंघू, गाझियाबाद येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केले आहे.

       

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some MLAs Blackmailing Officers, Contractors, Imtiaz Jaleel Allegation