
औरंगाबाद शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी व स्मार्ट औरंगाबादविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत लावण्यात आलेल्या ‘डिस्प्ले’ बोर्डवरून राजकिय रणकंदन माजत आहे.
औरंगाबाद : शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी व स्मार्ट औरंगाबादविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत लावण्यात आलेल्या ‘डिस्प्ले’ बोर्डवरून राजकिय रणकंदन माजत आहे. छावणी भागातील नेहरू पुतळ्याजवळ लावलेला ‘लव्ह औरंगाबाद’चा डिजिटल बोर्ड सोमवारी (ता. २१) रात्री फोडल्याचा प्रकार घडला. यात आज (ता. २२) दुपारी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. शहरात प्रमुख चौकांमध्ये ‘लव्ह औरंगाबाद’, ‘लव्ह खडकी’, ‘लव्ह प्रतिष्ठान’ असे ‘डिस्प्ले’ बोर्ड महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आले आहेत.
काही जागा खासगी संस्थांनाही सुशोभीकरणासाठी देण्यात आल्या. परंतु या ‘डिस्प्ले’ बोर्ड आणि ‘सेल्फी पॉईंट’वरून शहरात राजकारण सुरू झाले. यावरुनच शिवसेना विरुद्ध एमआयएम असा राजकिय वाद रंगत असतानाच सोमवारी रात्री छावणीतील नेहरू पुतळ्याजवळ लावलेला ‘लव्ह औरंगाबाद’चा डिस्प्ले बोर्ड अज्ञात व्यक्तींनी फोडला. मंगळवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. घटनेनंतर छावणीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यात गुन्ह्याची नोंद झाली.
मद्यपीने केला प्रकार
तोडफोड प्रकरणी छावणी पोलिसांनी आज संशयित विष्णू अंबादास काळे (रा. तोफखाना, छावणी) याला अटक केली. रात्री या बोर्डजवळ तो दारू पित बसला होता. तेथे दारू पिऊ नये म्हणून त्याला सुरक्षा रक्षकाने हटकले. याचा राग आल्याने दोघांत झटापट झाली. त्यानंतर त्याने तोडफोड केली, अशी माहिती छावणी पोलिसांनी दिली. पोलिसांचा या बोर्डजवळ बंदोबस्त तैनात करण्यात आला.
Edited - Ganesh Pitekar