ट्रकने जोरदार धडक दिल्याने जावयाचा सासऱ्याच्या घरासमोरच मृत्यू, बैलही दगावला

नवनाथ इधाटे
Saturday, 17 October 2020

सासूरवाडीतून आपल्या मूळगावी दुचाकीवरुन परतणाऱ्या जावयाला भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. यात सासऱ्याच्या घरासमोरच जावयाचा मृत्यू झाल्याची घटना फुलंब्री-राजूर रस्त्यावरील जातेगाव फाटा (ता.फुलंब्री) परिसरात शनिवारी (ता.१७) घडली.

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : सासूरवाडीतून आपल्या मूळगावी दुचाकीवरुन परतणाऱ्या जावयाला भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. यात सासऱ्याच्या घरासमोरच जावयाचा मृत्यू झाल्याची घटना फुलंब्री-राजूर रस्त्यावरील जातेगाव फाटा (ता.फुलंब्री) परिसरात शनिवारी (ता.१७) घडली. आजिनाथ जगन्नाथ राऊत (वय ३०, रा. आडगाव खुर्द, ता.फुलंब्री) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तसेच एका बैलाचाही या अपघातात मृत्यू झाला.

युनिर्व्हसल हायस्कूलविरुद्ध शिक्षण विभागाची कारवाई, पालकांनी खासदार जलील यांच्याकडे केली होती तक्रार

फुलंब्री-राजूर रस्त्यावरून दररोज भरधाव वाहने ये-जा करीत असतात. शनिवारी आजिनाथ राऊत हा त्याच्या जातेगाव परिसरात राहत असलेल्या सासुरवाडीत आला होता. शनिवारी रात्री आठच्या सुमारास आजीनाथ आपल्या गावाकडे जाण्यासाठी दुचाकीने (एमएच २० सी.सी १३७५) जात असताना सासऱ्याच्या घरासमोरच राजूरकडून फुलंब्रीकडे भरधाव मिरची वाहतूक करणारा आयशर ट्रकने (एमएच २१ बीएच १११५) आजिनाथच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकी ट्रकसमोरील चाकामध्ये गुंतून फरफटत गेल्याने यात आजिनाथ राऊत याला पायाला आणि हृदयाला जोराचा मार लागला.

रुग्ण संख्या घटली तरी कोविड सेंटर राहणार सुरू, औरंगाबाद महापालिकेचा निर्णय

त्यानंतर या आयशर ट्रकने समोर रस्त्याच्या बाजूला बांधलेल्या बैलालाही धडक दिली. यात बैलाचाही मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या आजिनाथ राऊत याला तात्काळ फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉ.गणेश डोईफोडे यांनी आजिनाथ यास तपासून मृत घोषित केले. आजिनाथ यांचे रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत फुलंब्री पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son In Law Died In Accident Aurangabad News