रुग्ण संख्या घटली तरी कोविड सेंटर राहणार सुरू, औरंगाबाद महापालिकेचा निर्णय

माधव इतबारे
Saturday, 17 October 2020

कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी काही दिवसांपासून शहरातील रुग्णांची संख्या मात्र घटत आहे. असे असले तरी कोविड केअर सेंटर बंद न करण्याचा निर्णय औरंगाबाद महापालिकेने घेतला आहे.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी काही दिवसांपासून शहरातील रुग्णांची संख्या मात्र घटत आहे. असे असले तरी कोविड केअर सेंटर बंद न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आगामी काळ सणांचा असून, गर्दीमुळे धोका वाढू शकतो, असे प्रशासकांचे मत आहे. दरम्यान शहरातील बहुतांश क्वारंटाईन सेंटर बंद करण्यात आले आहेत.

पालकमंत्री गडाखांनी शेतकऱ्यांसमवेत बांधावरच घेतली बैठक, अधिकाऱ्यांना घेतले बोलवून

कोरोबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने सात ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु केले आहेत. त्यात मेल्ट्रॉन, सिपेट, किलेअर्क, पदमपुरा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी कॉलेज, कांचनवाडी या ठिकाणांचा समावेश आहे. शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासक आस्तितकुमार पांडेय यांनी सुमारे दोन हजार रुग्णांवर उपचार करता येतील, एवढी व्यवस्था करून ठेवली होती. मात्र संसर्ग पूर्णपणे थांबला नसला तरी काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होत आहे.

त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण कमी प्रमाणात दाखल होत आहेत. बरेच रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये जात आहेत. त्यामुळे राज्यातील काही महानगरपालिकांनी कोविड केअर सेंटर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, काही कोविड केअर सेंटर सुरु ठेवायचे की नाही? याबद्दल प्रशासकांसोबत चर्चा झाली. त्यांनी कोविड केअर सेंटरची संख्या कमी न करण्याची सूचना केली. येत्या काळात दसरा-दिवाळीसह विविध सण आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होईल. या गर्दीमुळे संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे सध्या सुरू असलेले सेंटर बंद न करण्याची सूचना त्यांनी दिल्याचे पाडळकर यांनी सांगितले.

वारे रे पठ्ठ्या ! नाट्यमंदिरे खुले करण्यासाठी बारा तास दिला 'ठिय्या'

३३ सेंटर रिकामे
शहरात वाढत्या कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी ३४ क्वारंटाईन सेंटर सुरु केले होते. त्यातील ३३ सेंटर रिक्त आहेत. त्यामुळे ती बंद अवस्थेत आहेत. संत तुकाराम हॉस्टेल, नवखंडा कॉलेज, कलाग्राम, सीएसएम वसतीगृह, महसूल प्रबोधिनी, एमसीईडी, रमाई वसतीगृह, यशवंत वसतीगृह, अतिथिगृह , जामा मशिद, शहीद भगतसिंग वसतीगृह, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे वसतीगृह, देवगिरी मुलींचे वसतीगृह, बीएड कॉलेज मुलींचे व मुलांचे वसतीगृह, विभागीय क्रिडा संकुल आणि वसतीगृह, रविंद्रनाथ टागोर, अकॅडमीक वसतीगृह, आयएचएम वसतीगृह, हॉटेल मेनॉर, सहारा हॉटेल, हॉटेल एम्बेसी, हॉटेल जिमखाना, हॉटेल विटस्, हॉटेल जिंजर,हॉस्टेल स्काय कोर्ट, हॉटेल सेव्हन अॅपल, पी. यू. जैन वसतीगृहात एकही संशयित नाही.

१६ जवान पॉझिटिव्ह
शनिवारी सीआरपीएफ सेंटर मधील जवानाची तुकडी बिहार मधून औरंगाबादला परतली, त्यातील २५१ पैकी १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Corona Cases Decline But Covid Center Will Continue Aurangabad News