डिसेंबर अखेरीस दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल

संदीप लांडगे
Sunday, 13 December 2020

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.

औरंगाबाद : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च दहावी-बारावी परीक्षेचा निकाल जून महिन्यात मे-जून महिन्यात जाहीर करण्यात येत असतो. परंतु देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करत सरासरी गुण देण्याचा निर्णय झाला.

त्यानंतर इतर वर्गांच्या परीक्षा न घेताच सुट्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे नियमित परीक्षांचा निकालही यंदा उशीरा लागला. पुरवणी परीक्षा देखील जुलैऐवजी नोव्हेंबरमध्ये घेण्यात आली. २० नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षा संपली असून, या परीक्षेचा निकाल डिसेंबर अखेरीस जाहीर करण्यात येईल. यंदा पुरवणी परीक्षेला देखील अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत परीक्षेस कमी विद्यार्थी बसले होते. साडेसहा हजार विद्यार्थी विभागात होते. विद्यार्थी संख्या कमी असल्याने निकाल लागण्यास विलंब होणार नाही. वेळेत निकाल लागेल. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावी आणि बारावी दोन्हीचे निकाल लागतील असेही पुन्ने यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC, HSC Supplement Examination Result Declare December End