औरंगाबाद जिल्ह्यातील केळगावमध्ये अघोषित संचारबंदी

सचिन चोबे
Sunday, 13 December 2020

दगडफेकीच्या घटनेत सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक किरण बिडवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 50 जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिल्लोड (जि. औरंगाबाद) : केळगाव (ता.सिल्लोड) येथील महिला पोलिस पाटीलाने विषप्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना जामीन मिळाला आहे.

शुक्रवार (ता.11) रोजी केळगावात घटनेनंतर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आल्यानंतर शुक्रवार (दि.11) रोजी केळगावात संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी दगडफेक करीत पोलिसांच्या दोन गाड्यांसह आरोपीच्या घरांवर दगडफेक केल्याप्रकरणी आठ जणांवर ऍट्रासिटी तर 50 जणांवर सार्वजनिक मालमत्तेचे नूकसान व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शनिवार (ता.12) रोजी एकूण 58 गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

भाऊबंदकीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून

या प्रकरणी सुनिता विठ्ठल वाघ (वय.28) रा.केळगाव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवार (दि.12) रोजी सोमिनाथ नारायण कोल्हे, संतोष दगडू जाधव, डॉ.बापू पुंडलिक मख, विकास साहेबराव मुळे, दत्तू कडूबा कोल्हे, विजय उत्तम पवार, सर्जेराव उत्तम पवार, रोहिदास उत्तम पवार यांच्या विरोधात ऍट्रासिटी कायद्यानूसार गुन्हा दाखल केला. तर इतर पन्नास जणांवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दगडफेकीच्या घटनेत सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक किरण बिडवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 50 जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, केळगाव येथिल महिला पोलिस पाटील निर्मलाबाई बाळासाहेब ईवरे यांना रामदास विठ्ठल वाघ याने गुरूवार (दि.10) रोजी विनयभंग करून अश्लील शिविगाळ केली. तर मिराबाई विठ्ठल वाघ यांनी शिविगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यामुळे निर्मलाबाई यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

परिस्थितीवर मात करत अखेर चारही बहिणी होणार डॉक्टर

याप्रकरणी पोलिसांनी जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केला. परंतू यानंतरही शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास केळगाव येथे माजी सरपंच सोमनाथ कोल्हे, उपसरपंच जाधव व गावातील इतर अंदाजे 200 पुरूष व महिला हे एकत्र जमा झाले व मोठ्याने घोषणाबाजी करून लोकांना भडकविण्याचे काम करित आहे अशी माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही पोलिस कर्मचाऱ्यांसह लाठी, हेल्मेट, अश्रूधूरच्या नळकांड्या व रायफल राऊंडसह केळगावला गेलो. मंदिरातील लाऊडस्पीकरवरून जमलेल्या लोकांसोबत संवाद साधून शांतता ठेवण्याचे आवाहन केले. परंतू तेथे उपस्थित असलेले डॉ.बापू पुंडलिक मख यांनी नागरिकांना चिथावणी दिली. त्यामुळे जमावातील काही जणांनी आरोपीच्या घरावर दगडफेक केली.

दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. शासकीय मालमत्तेचे नूकसान केले. त्यामुळे सार्वजनिक मालमत्ता नूकसान प्रतिबंधक कायद्यानूसार संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकट पोलिसांच्या कारवाईनंतर केळगावात सन्नाटा. दगडफेकीच्या घटनेनंतर केळगावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. शुक्रवारी मध्यरात्री पोलीसांनी गावात कोम्बिंग ऑपरेशन करित 58 जणांना ताब्यात घेतले. संबंधित घटनेचा विचार करता घडलेल्या घटनेमुळे केळगावात अघोषित संचारबंदीचे वातावरण होते. पोलिसांच्या कारवाईमुळे गावात सन्नाटा बघावयास मिळाला.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kelgaon in Aurangabad district curfew