photo
photo

मातीमाय : खेड्याची दुर्दश:

 मातीमाय नाटक : 

माणूस अडाणी असला तर त्याचे शोषण सर्वचजण करतात. पाटील, सावकार सरकारी नोकरशाही सगळेचजण. त्यामुळेच शिक्षणाचे महत्त्व गेली शेकडो वर्षे संत विचारवंत, सातत्याने सांगत आले आहेत.

तरीही अजून समाजात अडाणी लोकांची संख्या कमी नाही. या नाटकातील खेड्यातील बहुतांश जण अडाणी आहेत. गरिबी दारिद्य्र याच्याशी ते बिचारे तोंड देताहेत. त्या खेड्यातील जमिनी एका धरण प्रकल्पासाठी सरकार घेणार याचा सुगावा गावातल्या पाटलाला लागतो. त्याआधी या जमिनी सावकाराच्या मदतीने मातीमोल किमतीत या अडाणी लोकांकडून कोऱ्या कागदावर त्यांचे अंगठे घेवून हडप करायच्या असा त्याचा प्रयत्न आहे.

अशा या कहाणीत ना नाविन्य आहे, ना कुठल्या वेगळ्या कल्पकतेने त्याची हाताळणी आहे. ही असंख्य अडाणी लोकांची शोकांतिका गावखेड्यांची दुर्दशा सरधोपट पद्धतीने मांडत नाटकाचा प्रवास सुरू होतो. मग यात पाहण्यासारखे काय आहे? नेपथ्य बरेच मोठे आणि वास्तवदर्शी ठेवलेय. म्हणजे कुडाची घरे, मारोतीचे देऊळ झाडाचा पार, घरातील पेटलेली चूल, जाते, ओटा इत्यादी कलावंतही पंचवीसएक आहेत. स्पॉटलाईट्‌सही भरपूर आहेत.

या सगळ्या मांडामांडीमुळे प्रस्तुत नाटक नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरू झाले. तांत्रीक अडचणीमुळे विलंब होतोय असे घोषितही केले गेले. सर्व कलावंतांनी जीव तोडून कामे केलीत. त्यामुळे भाबडा रसिक वर्ग हेलावतोही. काही जागा दिग्दर्शकाने फार छान घेतल्यात. उदाहरणार्थ गोलगोल चकरी फिरवीत दोरी वळणे, यावेळी जमिनी जाणार वगैरे कळल्यामुळे तो चकरी फिरविणे थांबवतो आणि चकरी गरगरा उलटी फिरू लागते. यात शहापूर- आदिवासी पट्ट्यात बोलली जाणारी भाषा आहे. वारली कोळी अशी मिक्‍स. त्या भाषेचाही एक गोडवा व वैशिष्ट्य आहे.

नाटकाच्या शेवट आशावादी आहे. या गावातली गरीब कुटुंबातली मुलगी जिद्दीने शिकून मोठी होते. कलेक्‍टर बनून त्या धरणाची पाहाणी करण्यासाठी येते असे सूचविणारा हा शेवट प्रेक्षकांना आशासाठी संदेश देतो. नाटकाचे संगीतही नाटकातील कारूण्य, दैन्य यांना अधोरेखित करणारे आहे. मातीमाय या नावाची पण वेगळ्या कथानकांची नाटके यापूर्वीही रंगमंचावर आलेली आहेत.

मातीमाय. लेखक पंढरीनाथ पांढरे, दिग्दर्शक दिपक सरोदे नेपथ्य : गौतम निमसे, प्रकाश : चेतन पडवळ. संगीत : आशुतोष वाघमारे. कलावंत : सुभाष शिंदे, प्रिती जाटे, मधुकर शिंदे, रमेश आरज, जागृती कांगेरे, काशीनाथ पडवळ, रघुनाथ कांगेरे, किरण पावसे, स्वप्नील सातपुते आदी 25 कलावंत सादरकर्ते : सह्याद्री कलासंघ डोळखांब, ता. शहापूर, जि. ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com