काळ्या आईशी नाळ मंत्री बनल्यावरही ठेवली कायम, रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांची शेतीविषयी प्रेम !

हबीबखान पठाण
Friday, 13 November 2020

शेतकरीपूञ कितीही उच्चपदावर गेला तरी शेतीशी असलेल्या नात्यात कधीही दुरावा येत नाही, हे राज्याचे फलोत्पादन व रोहयो मंञी संदिपान भुमरे यांनी त्यांच्या शेतीवरील प्रेमातून दाखवून दिले.

पाचोड (औरंगाबाद ) : शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पाचोड (ता. पैठण) येथील संदीपान भुमरे हे २५ वर्षापासून विधानसभेचे सदस्य असून ते राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन खात्याच्या मंत्रिपदाची महत्वाची जबाबदारी पेलत आहे. सेनेच्या शाखाप्रमुखापासून ते राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत सर्वच महत्त्वाचे पदे भुषविताना त्यांनी आपले शेतीवर असलेले प्रेम मंत्रीपद मिळाल्यानंतरही कायम ठेवत आपली नाळ काळ्या आईशी जुळलेली असल्याचे दाखवून दिले.
 
शेतकरीपूत्र कितीही उच्चपदावर गेला तरी शेतीशी असलेल्या नात्यात कधीही दुरावा येत नाही, हे राज्याचे फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी त्यांच्या शेतीवरील प्रेमातून दाखवून दिले. पैठण तालुक्यातील पाचोड गावचे भुमीपूत्र महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री मंडळात रोजगार हमी योजना व फलोत्पादन या महत्वाच्या खात्याचे मंत्री म्हणून श्री. भुमरे जबाबदारी सांभाळण्याबरोबर राज्यभर दौरे, बैठका, अतिवृष्टीने शेतपिकांची झालेली वाताहत कोरोना विषाणू विषयी उपायजोजना, आपात्कालीन बैठकासह एक ना अनेक महत्वाच्या कामांमध्ये त्यांची व्यस्तता असतानाही गावी येताच सर्वप्रथम शेतावर जाऊन चोहोबाजूंनी फेरफटका मारून शेती व पिकांची पाहणी करून सालगडयांना शेतीविषयक मार्गदर्शन करतानाचे चित्र पाहवयास मिळते.

मराठवाड्याच्या विकासासाठी सतीश चव्हाणांना निवडून द्या

एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी स्वतः हातात फावडे घेऊन पिकांना पाणी देण्यासही ते मागेपुढे पाहत नाही. तर वेळात वेळ काढून आपल्या मतदारसंघातील प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतात. शेतीमध्ये कोणती कामे सुरु आहेत, याची स्वतः शेतात जाऊन फेरफटका मारुन माहिती जाणून घेतात. यावरुन मंञी महोदयांची शेतीविषयक असलेली आवड, प्रेम, आपुलकी मंत्रीपदावर कार्यरत असताना सुध्दा कायम असल्याचे अधोरेखित होते. रोहयो मंत्री भुमरे यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झालेला असल्याने शेतीवषयी त्यांच्या मनात आजही पूर्वीसारखाच उत्साह आहे.

पाच वेळेस आमदार पद उपभोगणारे संदिपान भुमरे यांच्या गळ्यात सरळ कॅबिनेट मंत्र्याची माळ पडली. ते ग्रामीण भागातील शिवसेना पक्षातील जेष्ठ आमदार व नवख्या आमदारांमध्ये 'मामा' या नावाने स्वपरिचीत परंतु, साध्या सरळ स्वभावाचे तसेच पक्षाशी एकनिष्ठा राखल्याने शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भुमरेंशी थेट संपर्क साधून मंत्री मंडळातील खात्या संबंधित विचारणा जेव्हा केली. तेव्हा संदिपान भुमरेंनी सरळ ग्रामीण भागातील जनतेशी निगडीत असलेल्या खात्यासाठी आग्रह धरल्याने त्यांच्या शब्दाला मान देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्र्याची जबाबदारी सोपवली.

या खात्याची जबाबदारी मिळताच मंत्री भुमरे यांनी पहिल्याच धडाक्यात राज्यातील पहिले मोसंबी ग्रेडिंग, व्हॅक्सिंग व पॅकिंग प्रकल्पाची उभारण्यासाठी पावले उचलत पाचोडची निवड केली. संत्र्यासाठी नागपूरात जसे संशोधन केंद आहे, त्या धर्तीवर पैठण येथेही मोसंबी संशोधन केंद्र उभारण्यात येऊन नवनवीन जात (वाण) विकसित करण्यासाठी बारा कोटींचा निधी मंजूर केला. तसेच शेततळ्यासाठी पूर्वीची ३३ बाय ३३ ची अट रद्द करुन त्याऐवजी ४४ बाय ४४ ही अट सुरू करण्यात येणार आहे. तसेच पाच एकर फळबागाची अट काढून त्यात वाढीव करण्यात येणार आहे. तसेच नारळचा रोहयोअंतर्गत फळबागेत समावेश करण्याचा प्रश्न विचारधीन आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी वैयक्तिक लाभाच्या विहिरीच्या संख्येत वाढ केले जाणार आहे. ही सर्व कामे मार्गी लागली असती. परंतु कोरोना संसर्ग विषाणूने थैमान घातल्याने शासनाचे सर्व लक्ष सध्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे प्रलंबित आहे.

'लॉकडाऊन'च्या काळात रोहयोमंञी भुमरे यांनी शेतातील फार्महाऊसहून आपल्या खात्याचे कामकाज व्हिडीओ कॉन्फन्सव्दारे औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी भागाची पाहणी केली. चक्रीवादळामुळे कोकण भागाला बसलेल्या तडाक्यामुळे शेतीची झालेली नासधूस याचीही रोहयो मंत्र्यांकडून पाहणी करण्यात आली. तसेच नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना धीर देण्याचे त्यांनी काम केले.

जमिनीची घट्ट नाळ 

अनेक राजकीय नेत्यांनी एक निवडणूक जिंकली किंवा एखादे पद मिळाले तर थाट वाढतो. नगरसेवकांपासून आमदार-खासदारांपर्यंत कुणाही बाबतीत आपणांस हे चित्र पाहवयास मिळते. मात्र काही राजकीय नेते जमिनीशी असलेली आपली नाळ घट्ट टिकवून ठेवतात, अशा या सन्माननीय अपवादांमध्ये राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री भुमरे आहेत. त्यांचे आजही शेतीकडे लक्ष आहे. ते राजकीय क्षेत्रात सक्रिय राहूनही आपल्या शेतीसाठी वेळ काढतात. याचे कारण म्हणजे त्यांना काळ्या आईची असलेली नैसर्गिक ओढ. मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने हल्ली त्यांना फारसा वेळ मिळत नसला तरी त्यांना पाचोड व दक्षिण जायकवाडी येथील शेतात गेल्याशिवाय चैन पडत नाही.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The states horticulture and Rohyo Manji Sandipan Bhumare loves the farm very much