चोरीच्या पाच दुचाकी जप्त, गॅरेजवर व्यवहार करतानाच दोघांना बेड्या

मनोज साखरे
Monday, 22 February 2021

पोलिसांनी सेंट्रलनाका येथे सापळा रचला. त्यावेळी दोनजण दुचाकीवर आले व त्यांनी गॅरेजवर काम करणाऱ्यासोबत दुचाकीचा व्यवहार केला होता.

औरंगाबाद : पाच दुचाकीसह संशयित दोघांना जवाहरनगर पोलिसांनी सोमवारी (ता. २२) बेड्या ठोकल्या. ही कारवाई सेंट्रल नाका येथे करण्यात आली. सिद्धेश प्रवीण शिंदे (वय २२, पिसादेवी), रानू संजय अवचार (वय २५, रा, वाकी, ता. सेलू, जि. परभणी, ह. मु. मुकुंदवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. पुंडलिकनगर व जवाहरनगर भागातून चोरलेल्या दुचाकी काही तरुण विक्रीसाठी सेंट्रलनाका येथे नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

वाचा - कोरोना काळात औरंगाबादचे राजकारणी इतके बेफिकीर कसे? ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नियम काय जनतेनेच पाळायचे का?

पोलिसांनी सेंट्रलनाका येथे सापळा रचला. त्यावेळी दोनजण दुचाकीवर आले व त्यांनी गॅरेजवर काम करणाऱ्यासोबत दुचाकीचा व्यवहार केला होता. तेथे पोलिसांनी त्यांना दुचाकीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांना कागदपत्रे देता आली नाही. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. त्यानंतर पोलिस कोठडीदरम्यान चौकशीनंतर त्यांनी आणखी तीन दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या सुचनेनुसार, उपनिरीक्षक वसंत शेळके, हवालदार गजेंद्र शिंगणे, विजय अकोले, भाऊराव गायके, प्रदीप दंडवते, विजय वानखेडे, पोलिस अंमलदार संदीप क्षीरसागर यांनी केली.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stolen Five Two Wheelers Seized, Two Suspect Arrested Aurangabad Crime News