दराचा उच्चांक मोडणारी मोसंबी सापडली कोरोनाच्या संकटात 

हबीब पठाण
Monday, 30 March 2020

पाचोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मोसंबीची आवक कमालाची घटली असून दररोज तीनशे टनाचा पल्ला गाठलेली आवक कोरोनामुळे खुपच कमी झाली आहे. यंदा मृग बहाराच्या मोसंबीचे उत्पादन अधिक असल्याने बागांवर झालेला खर्च निघण्याची अपेक्षा फोल ठरली. 

पाचोड (जि.औरंगाबाद): चार महिन्यापूर्वी सोन्याचा भाव मिळालेली मोसंबी सध्या ‘कोरोना’च्या संकटात सापडली आहे. टनामागे ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत घसरण होऊन मोसंबी सध्या पाच ते सहा रुपये प्रती टनाने विक्री होत असल्याने उत्पादकांना जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. परराज्यातील वाहतुक थांबलेली असल्याने शेतकऱ्यासमोर सध्या मोठे संकट आहे. 

पाचोड (ता.पैठण) येथे मोसंबीची मोठी बाजारपेठ आहेत. चार महिन्यापूर्वी आंबा बहराची फळे पन्नास ते पंचावन्न हजार रुपये प्रतिटन विकली जाऊन आज वरचा उच्चांक मोडला गेला; तर महीनाभरापूर्वी मृग बहार वीस ते सत्तावीस हजार रूपये प्रतिटनाप्रमाणे विकला गेला. मोसंबीला चांगले दिवस आले असल्याचे समजून शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या उमेदीने बागांना नवसंजीवनी देऊन दुप्पट उत्पन्न घेतले. 
मात्र कोरोनाच्या सावटाने मोसंबी उत्पादक चांगलेच धास्तावले आहे. याचा शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. 

हेही वाचा- जेष्ठ नागरीकांनो अशी घ्या काळजी

मृग बहरातील मोसंबीचे उत्पादन निघायला सुरुवात होऊन स्थानिक बाजारपेठेत दररोज तीनशे ते चारशे टन मोसंबीची आवक वाढली. त्यास सुरवातीला सतरा ते सतावीस हजारांचा प्रतिटन भाव मिळाला व आता तर चक्क पाच ते सहा हजार प्रती टन असा दर मिळतोय. 

पाचोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मोसंबीची आवक कमालाची घटली असून दररोज तीनशे टनाचा पल्ला गाठलेली आवक कोरोनामुळे खुपच कमी झाली आहे. यंदा मृग बहाराच्या मोसंबीचे उत्पादन अधिक असल्याने बागांवर झालेला खर्च निघण्याची अपेक्षा फोल ठरली. 
 

कोरोनामुळे दिल्ली, अहमदाबाद, सुरत, आग्रा, नागपूर, हैदराबाद, मुंबई, पुणे, कोलकाता अशा ठिकाणच्या बाजारपेठा बंद असल्याने मोसंबीची कोंडी झाली. त्यातच मोसंबीला अधिक काळ टिकवून ठेवू शकत नाही.त्याची वेळीच विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. सर्वत्र राज्याच्या सीमा बंद असल्याने मोसंबी बाहेर जाणे शक्य नाही. 
- अय्युबसेठ (अध्यक्ष, मोसंबी व्यापारी संघ) 

चांगले उत्पन्न मिळेल या आशेने गतवर्षी दुष्काळाच्या संकटातून जगवलेली मोसंबी बाजारात पाच-सहा हजार रुपये टनाप्रमाणे विकत असल्याने आर्थिक गणितच विस्कटले. मोसंबीपेक्षा कापुस बरा अशी धारणा झाली आहे. मोसंबीच्या बागेवर लाखो रुपये खर्च केले आता हा खर्च कसा निघेल. 
- सुभाष निर्मळ (मोसंबी उत्पादक) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sweet lemon Market In Pachod Aurangabad News