esakal | शहर बसच्या प्रारंभाला नाट, ई-तिकीट प्रणालीला कर्मचाऱ्याचा विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Smart City Bus Service

स्मार्ट शहर बससेवेच्या नव्याने झालेल्या प्रारंभाला गुरुवारी (ता. पाच) नाट लागली. बसच्या वाहकांनी महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना अडवत ई-तिकीट प्रणालीला विरोध केला.

शहर बसच्या प्रारंभाला नाट, ई-तिकीट प्रणालीला कर्मचाऱ्याचा विरोध

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंबाद : स्मार्ट शहर बससेवेच्या नव्याने झालेल्या प्रारंभाला गुरुवारी (ता. पाच) नाट लागली. बसच्या वाहकांनी महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना अडवत ई-तिकीट प्रणालीला विरोध केला. एसटी महामंडळाप्रमाणे प्रणाली राबवावी, अशी मागणी त्यांनी केली, त्यावर तुमचे वर्तन योग्य नाही, तुमचे काय प्रश्‍न असतील ते स्मार्ट सिटीचे मुख्य व्यवस्थापक पाहतील, असे श्री. पांडेय यांनी स्पष्ट केले. बस खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्यात आली असून, प्रवाशांसाठी मोबाइल अ‍ॅप्लीकेशन, स्मार्ट कार्ड, ई-तिकीट मशीन, बस ट्रॅकिंग सुविधा, प्रवासी माहिती प्रणाली, प्रवाशांना थांबण्यासाठी स्मार्ट बसस्टॉप या सेवा विकसित करण्यात आल्या आहेत.

सत्तेचा मोह असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प, विनायक मेटेंचा घणाघात

अ‍ॅन्ड्रॉईड ई-तिकीट मशीनमुळे प्रवाशांना सर्व बँकांचे डेबिट व क्रेडिट कार्ड, वॉलेटद्वारे भाडे देता येणार आहे. सोबतच रोख तिकिटाची देखील व्यवस्था आहे. दुपारी साडेबारा वाजता प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते तसेच स्मार्ट सिटी बसचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांच्या उपस्थितीत सिडको बसस्थानक परिसरात बसचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री. पांडेय यांनी प्रवाशांसोबत संवाद साधत स्मार्ट बसमधूनच प्रवास करण्याचे आवाहन केले. यावेळी श्री. पांडेय यांना वाहकांनी अडवले व इ-तिकीट प्रणालीला विरोध केला.

एसटीप्रमाणे तिकीट व प्रवासी टॅली करण्याची पद्धत वापरावी, प्रवाशांकडे तिकीट नसेल तर वाहकाऐवजी प्रवाशांनाच दंड करावा. मात्र प्रशासन आम्हालाच जबाबदार ठरवत दंड आकारत आहे, अशावेळी कमी वेतनावर आम्ही काम कसे करणार? यावर तोडगा काढण्याची मागणी एस. एस. पैठणकर, एस. बी. पवार या वाहकांनी केली. श्री. पांडेय यांनी तक्रार करण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगत, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आता स्मार्ट बस सुरू केली आहे. वाहकांना काही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्‍याची सूचना प्रशासकांनी भुसारी यांना केली.

गैरप्रकारांना बसेल आळा
यासंदर्भात प्रशांत भुसारी यांनी सांगितले, की गैरप्रकार थांबवणे, नुकसान टाळणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठीच ई-तिकिटींगची नवीन प्रणाली आणली आहे. वाहकांना त्याचा त्रास होण्याचा प्रश्‍नच येत नाही.


संपादन - गणेश पिटेकर