तेव्हा कम्युनिस्टही देवासमोर हात जोडतात : राज्यपाल भगतसिंग कोशियारी

अतुल पाटील
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद : माता, मातृभाषा, मातृभूमी हे नेहमीसाठी लक्षात ठेवले तर आपणही मर्यादा पुरुषोत्तम बनू शकतो. तुळजाभवानीही तुम्हाला साथ देईल, हात जोडायची गरज भासणार नाही. 50 टक्‍के यश यातूनच मिळेल; कारण आपले विचार, प्रयत्न चांगले असतील. मी खूपदा पाहिले आहे. कम्युनिस्ट देवाला नावे ठेवत, आम्हाला वेड्यात काढत, पुजाऱ्यांना नावे ठेवायचे, तुमच्या विचारसरणीचे लोक वेडे आहेत, असे म्हणायचे. परीक्षेची वेळ आली की, तेच देवासमोर जाऊन हात जोडत होते, असे राज्यपाल भगतसिंग कोशियारी म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हीरकमहोत्सवी दीक्षांत समारंभात श्री. कोशियारी बोलत होते. विद्यापीठाच्या नाट्यगृहात मंगळवारी (ता. 11) कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सीएसआयआर-नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक प्रा. अश्‍विनीकुमार नांगिया, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची उपस्थिती होती. यावेळी 105 जणांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

पंतप्रधानांवर उधळली स्तुतीसुमने
गेल्या 70 वर्षांत देशात अनेक सरकार, पंतप्रधान आले; मात्र 2014 नंतरचा पंतप्रधान छोट्या-छोट्या गोष्टी करतो. घराघरात शौचालय, वीज, गॅस घेऊन जातो. मी पंतप्रधान किंवा सरकारची स्तुती करीत नाही; पण चांगली गोष्ट कशी करायची, हे मला सांगायचे आहे. देशाचा पंतप्रधान 20 तास काम करतोय आणि राज्यपालांना 17 तास करता येत नसेल तर पदच सोडायला पाहिजे, असेही राज्यपाल कोशियारी सांगितले.

चीनची प्रगती चायनीज भाषेमुळेच
श्री. कोशियारी म्हणाले, ज्या देशाने मातृभाषेत शिकवले, त्या देशाने प्रगती केली. चीनमध्ये इंग्रजी तीस वर्षांत आली. त्यापूर्वीची प्रगती त्यांनी चायनीज भाषेतच केली. त्यांची लिपी समजणेही अवघड आहे. तसेच तमीळ, तेलगू भाषेचेही आहे. मोठे लक्ष्य ठेवा. मी करू शकतो. मी जिंकू शकतो. प्रयत्न करीत असताना छोटे-छोटे प्रयत्न करा.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

देशाचे पंतप्रधान जेव्हा आर्थिक विकासाबाबत बोलतात, ते आपल्या भरवशावर बोलत असतात. चारित्र्य आणि शिक्षणाच्या जोरावर प्रगती करू. देशाला पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. तोच वारसा घेऊन त्यांच्याही पुढे जाऊ. मला विश्‍वास आहे, देशाचे, विद्यापीठाचे, आई-वडिलांचे नाव उंचवाल.

या सदस्यांचा बहिष्कार
व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, संजय निंबाळकर, डॉ. फुलचंद सलामपुरे, प्राचार्य जयसिंगराव देशमुख, प्रा. राहुल म्हस्के, सुनिल निकम, डॉ. नरेंद्र काळे या निवडून आलेल्या सदस्यांनी दीक्षांत समारंभावर बहिष्कार टाकला. प्रतिगामी अजेंडा विद्यापीठ प्रशासन राबवत असल्याबाबत वरिल सदस्यांनी नाराजी व्यक्‍त केली. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसनेही संघविचाराच्या राज्यपालांना दीक्षांत समारंभासाठी बोलावण्यात येऊ नये, यासाठी कुलगुरुंना निवेदन दिले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Then Communists Join Hands Before God : Governor Koshyri