कडबा कुट्टी यंत्रात हात गेल्याने युवकाचे तुटली बोटे ; थेरगाव येथील घटना

हबीबखान पठाण
Saturday, 26 December 2020

म्हशी चाऱ्याची नासधूस करित असल्याने त्याने कडबा कुट्टी यंत्र आणले. मात्र नवीनच असल्याने व त्यास कुट्टी यंत्राचे अधिक ज्ञान नसल्याने शिवनाथ याने यंत्रात कडब्यासोबत हात टाकले असता डाव्या हाताची चार बोटांची लहान लहान तुकडे झाले.

पाचोड (औरंगाबाद) : गुरांना वैरण टाकण्यासाठी यंत्राद्वारे कुट्टी काढत असताना यंत्रात हात अडकून तरुणाच्या हाताचे चार बोटाचे तुकडे झाल्याची घटना थेरगाव ( ता. पैठण) येथे शुक्रवारी (ता.२५) दुपारी घडली.

औरंगाबादच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहीती अशी, थेरगाव (ता.पैठण) येथील २२ वर्षीय युवक शिवनाथ जनार्धन गाडेकर याने यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतात काही पिकले नसल्याने चार म्हशी खरेदी करून शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला. म्हशी चाऱ्याची नासधूस करित असल्याने त्याने कडबा कुट्टी यंत्र आणले. मात्र नवीनच असल्याने व त्यास कुट्टी यंत्राचे अधिक ज्ञान नसल्याने शिवनाथ याने यंत्रात कडब्यासोबत हात टाकले असता डाव्या हाताची चार बोटांची लहान लहान तुकडे झाले. यंत्रात हात जाताच शिवनाथ मोठयाने ओरडला. जवळच शेतात काम करीत असलेल्या त्याच्या आई सुनिता व वडील जनार्धन गाडेकर यांनी तातडीने त्यास गावांत आणले. गावातून अशोकराव निर्मळ यांनी स्वतःच्या वाहनाने जखमी अवस्थेत शिवनाथला पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले. वैद्यकिय अधिकारी डॉ. रामेश्वर घुगे यांनी प्रथमोपचार केले व अधिक रक्तस्त्राव होत असल्याने त्यास पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे पाठविण्यात आले.
 
ताज्या बातम्या वाचण्यासाठी ई -सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

शिवनाथ घरातील सर्व जबाबदारी सांभाळत होता, त्याच्या या कायम अपंगत्वामुळे गावांत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामस्थानी जखमी शिवनाथच्या उपचारासाठी शासनाने तातडीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत मदत उपलब्ध करुन द्यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Thergaon the fingers of a youth have been broken due to a hand in a Kadba Kutti machine