मास्क न वापरल्याबद्दल मोजले ३५ लाख, औरंगाबादेत साडेपाच महिन्यांत सात हजार जणांकडून दंड वसूल

माधव इतबारे
Saturday, 24 October 2020

कोरोनाचे वाढते रुग्ण आणि शहरात आतापर्यंत सुमारे साडेसातशे जणांचा मृत्यू झाला असला तरी नागरिक गंभीर नसल्याचे वारंवार समोर येत आहे. अनेक जण दंड भरू पण विनामास्क फिरू, अशा आविर्भावात फिरत आहेत.

औरंगाबाद : कोरोनाचे वाढते रुग्ण आणि शहरात आतापर्यंत सुमारे साडेसातशे जणांचा मृत्यू झाला असला तरी नागरिक गंभीर नसल्याचे वारंवार समोर येत आहे. अनेक जण दंड भरू पण विनामास्क फिरू, अशा आविर्भावात फिरत आहेत. एक मे ते २० ऑक्टोबरदरम्यानच्या साडेपाच महिन्यांमध्ये शहरातील सुमारे सात हजार १६८ जणांकडून ३५ लाख ८४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, हे त्याचेच द्योतक आहे.

कोरोना अजून संपलेला नाही! आठशे जणांत १२१ पॉझिटीव्ह, दोन ते तीन टक्के झाली वाढ

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, स्वच्छता, गर्दी टाळणे आदी उपाययोजना आवश्यक असून तसे शासन, प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जाते. यातील काही नियम न पाळणाऱ्यांना दंड करण्याचे इशारे आणि अंमलबजावणीही सुरू झाली; मात्र तीही सवयीचा भाग बनल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मास्कबाबत तसे घडताना दिसते. मास्क न वापरता रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार शहरात घनकचरा विभागातर्फे सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथकाद्वारे एक मेपासून कारवाया सुरू करण्यात आल्या. एक मे ते २० ऑक्टोबरदरम्यान विनामास्क फिरणाऱ्या सात हजार १६८ नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३५ लाख ८४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirty Lakh Rupees Collected By Unmasked Residents Aurangabad News