नाफेडतर्फे तीन हजार ६३३ क्विंटल तुरीची खरेदी

प्रकाश बनकर
शनिवार, 21 मार्च 2020

तूर उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय दराने तूर खरेदी करण्यासाठी औरंगाबाद, गंगापूर आणि खुलताबाद येथे शेतकऱ्यांना तुरीची नोंदणी करण्यात येत आहे. सध्या पाच हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर खरेदी केली जात आहे.

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळावा यासाठी राज्य सरकारतर्फे नाफेडच्या माध्यमातून दोन वर्षांपासून तूर खरेदी सेंटर सुरू करण्यात आले. यंदाही द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या वतीने जिल्ह्यात सहा खरेदी सेंटर सुरू करण्यात आले.

त्यानुसार जिल्ह्यातील तीन खरेदी सेंटरवरून गुरुवारपर्यंत (ता. १९) ७५७ शेतकऱ्यांची तीन हजार ६३३ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. नोंदणीसाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आल्याने यात आणखी शेतकऱ्यांना सहभागी होत शासकीय हमीभावाने तूर विक्री करता येणार असल्याचे मार्केटिंग अधिकारी राम थोरात यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

  तूर उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय दराने तूर खरेदी करण्यासाठी औरंगाबाद, गंगापूर आणि खुलताबाद येथे शेतकऱ्यांना तुरीची नोंदणी करण्यात येत आहे. सध्या पाच हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर खरेदी केली जात आहे. हंगाम २०१९-२० मधील आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने तूर खरेदीसाठी एक जानेवारी २०२० पासून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आधी तूर खरेदीसाठी नोंदणीची असलेली मुदत १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती.

एक फेब्रुवारीपासून राज्यातील विविध केंद्रांवरून प्रत्यक्ष तूर खरेदीला सुरवात करण्यात आली होती. ११ मार्चअखेर राज्यातील ३२५ खरेदी केंद्रांवर ३,९९,३७९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. जिल्ह्यात १९ मार्चपर्यंत दोन कोटी ४४ लाख तीन हजार ५०० रुपयांची तीन हजार ६३३ क्विंटल तुरीची खरेदी केली तर एक हजार ३३८ शेतकऱ्यांना नोंदणी केली. राज्यातील सहा जिल्ह्यांत भारतीय अन्न महामंडळामार्फत (एफसीआय) तुरीची उशिराने खरेदी सुरू करण्यात आली होती.

यंदा खरिपाच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यात काही शेतकऱ्यांना पिकवलेली तूर विक्री होत आहे. जिल्ह्यात नाफेडतर्फे आवाहन करूनही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे उशिराने तूर खरेदी सुरू झाली. यामुळे वेळोवेळी तूर खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनला मुदतवाढ द्यावी लागली. जिल्ह्यात गंगापूर, औरंगाबाद बाजार समिती, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव ही सेंटर्स सुरू आहेत. 
 

सेंटर्सचे नाव विक्री करणारे शेतकरी झालेली खरेदी नोंदणी केलेले शेतकरी 
गंगापूर ५४८ २,७५० ९७२
औरंगाबाद  १३१ ६९३ १५६ 
खुलताबाद ७८ १९० १४२ 
वैजापूर ०० ०० १ 
कन्नड ०० ००
सोयगाव ०० ०० ६६

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Thousand Five Quintal Tur Dal Purchased By NAFED