ढगफुटीने औरंगाबाद शहरात दाणादाण, कानठळ्या बसविणारा कडकडाट अन् २४ मिनिटात ५० मिलिमीटर पाऊस

माधव इतबारे
Thursday, 22 October 2020

परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, बुधवारी (ता. २१) सायंकाळी कानठळ्या बसविणाऱ्या विजांच्या कडकडाटासह ढगफुटीपेक्षाही वेगात झालेल्या पावसाने शहरवासीयांना धडकी भरविली.

औरंगाबाद : परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, बुधवारी (ता. २१) सायंकाळी कानठळ्या बसविणाऱ्या विजांच्या कडकडाटासह ढगफुटीपेक्षाही वेगात झालेल्या पावसाने शहरवासीयांना धडकी भरविली. ४८ मिनिटाच्या या पावसानंतर शहरातील सर्वच रस्त्यांवरून नदीप्रमाणे पाणी वाहिले. काही भागात हे पाणी घरात शिरले तर काही ठिकाणी तळमजल्यातील दुकाने पाण्याखाली गेली. त्यानंतर एकच धांदल उडली व मदतीसाठी अग्निशमन विभागाचे फोन खणखणले. या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत ५६.८ मिलिमिटर एवढी नोंद झाली आहे.

इंग्रजी शाळांना बाय बाय करत औरंगाबादेत तब्बल सात हजार विद्यार्थी ‘झेडपी’त दाखल 

शहर परिसरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अवघ्‍या काही मिनिटात पावसाचा जोर एवढा वाढला की, ढगफुटीपेक्षाही वेगात धारा कोसळत होत्या. त्यात कानठळ्या बसविणारा विजांचा कडकडाटही सुरू होता. विजांचा आवाज ऐकून अनेकांना आपल्याच घराशेजारी वीज पडली की काय असा भास होत होता. अनेकांनी घाबरून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. पहिल्या चोवीस मिनिटात म्हणजे पाच वाजून तीन मिनिट व पाच वाजून २३ मिनिटांपर्यंत तब्बल ५० मिलिमिटर एवढ्या पावसाची नोंद झाली.

एका तासात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास ढगफुटी समजली जाते. बुधवारी झालेला पाऊस हा १०० मिलिमिटर झाला नसला तरी पावसाचा वेग मात्र ढगफुटीपेक्षा जास्त होता. एकूण पावसाची नोंद ५७ मिलिमिटर एवढी झाली आहे, असे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लबचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी कळविले आहे. चिकलठाणा येथील वेधशाळेत ५६.८ मिलिमिटर एवढ्या पावसाची नोंद झाली.

वाहतुकीचा खोळंबा
पावसामुळे वाहनचालकांनी उड्डाणपूल, रस्त्यावर मिळेल तिथे आसरा घेतला. पाऊस उघडताच मात्र रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला. जालना रोडवर हॉटेल रामा समोर गुडघाभर पाणी साचल्याने याठिकाणी अनेक तास ट्रॅफिक जाम होती.

एमटीडीसीच्या दिशादर्शक फलकावर इंग्रजीच्या चुका, पर्यटनमंत्र्यांना ट्विट  

रस्त्यांना नदीचे स्वरूप
सुमारे ४८ मिनिट धो-धो पाऊस झाला. त्यामुळे सखल भागाला तळ्याचे स्वरूप आले तर रस्त्यावरून नदीप्रमाणे पाणी पाहत होते. नाले ओव्हरफ्लो होऊन काठावरील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. काही ठिकाणी तळमजल्यातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धांदल उडाली. अनेकांनी अग्निशमन विभागाला फोन करून मदतीसाठी याचना केली. अग्निशमन विभागाने तातडीने गाड्या पाठवून पाणी उपसण्यांचे काम केले. रात्री उशिरापर्यंत मदतीचे काम सुरूच होते.

या भागात उडाली दाणादाण
-उल्कानगरी चेतक घोडा चौक परिसर जलमय झाला होता. या भागातील अनेक अपार्टमेंटमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचे फोन अग्निशमन विभागाला आले.
-रिद्धी-सिद्धी हॉल परिसरातही काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
-उल्कानगरी भागातील आदित्य नगरात तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
-खिंवसरा पार्क भागातील पेट्रोलपंप परिसरात पावसाचे पाणी साचून हे पाणी घरांमध्ये शिरले.
-गारखेडा परिसरातील स्वप्ननगरी, आदर्शनगर भागाला पाण्याचा वेढा पडला.
-सिडको एन-भागातील अक्षयदीप प्लाझा येथील तळमजल्यातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरून दुकानदारांचे नुकसान झाले.
-माणिक हॉस्पिटल परिसरातील निरज अर्पाटमेंमध्ये पाणी शिरले.
-राज पेट्रोल पंपापाठीमागील अपार्टमेंटमध्ये पावसाचे पाणी शिरले.
-जयभवानीनगर भागात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहत होते.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thunder Storm, Heavy Rain Hit Aurangabad