
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आज मंगळवारपासून (ता. २२) सुरू होत आहे.
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आज मंगळवारपासून (ता. २२) सुरू होत आहे. औरंगाबाद मुख्य परिसर तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व अभ्यासक्रमांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील ४५ विभाग आणि उस्मानाबाद उपपरिसरातील १० विभागात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. या वर्षी एम.फिल. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविली.
या संदर्भात प्र-कुलगुरु डॉ. शाम शिरसाठ, प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांच्या उपस्थितीत कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले. विद्यार्थ्यांना २२ ते ३१ डिसेंबर दरम्यान, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल. २ जानेवारी रोजी प्राथमिक यादी तर, ६ जानेवारीला प्रवेशित विद्यार्थ्यांची पहिली यादी, १८ जानेवारीला दुसरी यादी तर, २३ जानेवारीला तिसरी यादी आणि स्पॉट अॅडमिशन देण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका १८ जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागातील विषय, उपलब्ध प्रवेशित जागा, आरक्षण, शुल्क, पात्रता आदी सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Edited - Ganesh Pitekar