औरंगाबादेत २५ लाखांचा गुटखा पकडला; दोघे अटकेत, पाच व्यापारी भूमिगत

सुषेन जाधव
Friday, 27 November 2020

ट्रान्सपोर्ट व्यवसाय म्हटले आपल्या डोळ्यासमोर जी प्रतिमा येते चक्क त्याला छेद दिल्याची घटना औरंगाबादेत घडली आहे.

औरंगाबाद : ट्रान्सपोर्ट व्यवसाय म्हटले आपल्या डोळ्यासमोर जी प्रतिमा येते चक्क त्याला छेद दिल्याची घटना औरंगाबादेत घडली आहे. रिक्षा, चारचाकीने गुटखा तस्करीवर पाळत ठेवत पोलिसांनी अंकूश लावल्याने गुटखामाफियांनी चक्क ट्रान्सपोर्टने गुटख्याच्या तस्करीला सुरुवात केल्याचा नविन फंडा शहरात गुरुवारी (ता.२६) दुपारी उघडकीस आला. गुन्हे शाखेच्या पथकाने मोंढा येथील बॅटको ट्रान्सपोर्टवर छापा मारत तब्बल २५ लाखांचा गुटखा जप्त करत दोन जणांना अटक केली. गुटखा जप्त झाल्याचे कळताच शहरातील पाच व्यापारी भूमिगत झाले आहेत.

थेट ट्रान्सपोर्टवर मारला छापा
ठिकठिकाणी करण्यात येत असलेल्या वाहन तपासणीत गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत असल्याचे पाहून चक्क लाखो रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित जर्दा चक्क ट्रान्सपोर्टने शहरात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांना मिळाली होती. त्यावरून सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकाने गुरुवारी (ता.२६) दुपारी मोंढा येथील बॅटको ट्रान्सपोर्टवर छापा मारला. गोडाऊनची तपासणी केली असता त्यात विविध कंपन्यांचा गुटखा आणि पान मसाला असलेल्या २४ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ६० गाठी आढळून आल्या.

या प्रकरणी पोलिसांनी ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक हनिफ अब्दुल रहेमान पटणीसह गुटखा व्यापारी नदीम शेख या दोघांना अटक केली. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना समजताच शहरातील मोठे व्यापारी अलर्ट झाले. हे व्यापारी पोलिसांना चकवा देत मध्य प्रदेशातील इंदोर येथून गुटखा आणि जर्दाचा साठा खरेदी करतात. व्यापाऱ्यासह गुटखामाफियादेखील माल मागवतात. शहरातील सहा व्यापाऱ्यांनी गुटख्याचा माल मागविल्याचे समोर आले आहे. मात्र, नदीम शेख हा समोर आल्याने त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अन्य पाच व्यापारी पोलिसांच्या धाकाने भूमिगत झाले आहेत.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty Five Lakh Gutkha Seized In Aurangabad