पाचवीच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला, मायलेकाचा अपघातात मृत्यू

सुभाष होळकर
Sunday, 11 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यात पाचवीच्या कार्यक्रमासाठी जाताना रिक्षा व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दोघांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

शिवना (जि.औरंगाबाद) : मादनी (ता. सिल्लोड) नजीक रिक्षा व दुचाकीची समोरासमोर झालेल्या अपघातात दोन ठार, तर दोन जण जखमी झाले. ही घटना रविवारी (ता.११) दुपारी बाराला अजिंठा- बुलडाणा राज्यमार्गावर घडली. अजिंठा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोटावद (ता.जामनेर) येथील भाजीपाल्याचे व्यापारी सागर सुभाष थोरात हे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने पाचवीच्या कार्यक्रमासाठी आपल्या आई व नातेवाईकांना रिक्षामध्ये घेऊन लाखनवाडा (जि.बुलडाणा) येथे निघाले होते.

ड्युटीवर निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू, अंबड तालुक्यातील घटना. 

शिवना बसस्थानक सोडल्यावर मादनी गावानजीक समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात त्यांच्या आई मालताबाई सुभाष थोरात (वय ५५) या जागीच ठार झाल्या, तर ऐश्वर्या राहुल थोरात (रा. पहूर, ता.जामनेर) ही त्यांची आठ वर्षीय भाची किरकोळ जखमी, स्वतः सागर सुभाष थोरात (वय २७) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ जळगाव येथे हालविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दुचाकीवरील किशोर संजय राऊत (वय २२) व योगेश संजय राऊत (वय २८) हे दोघे सख्खे भाऊ (रा.मादणी ता. सिल्लोड) गंभीर जखमी असून पुढील उपचारार्थ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजिंठ्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार निलेश शिरसकर, कौतिक चव्हाण पुढील तपास करित आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Dies In Autorikshaw Twowheeler Accident Aurangabad News