खामनदी पात्रातील दोनशे कुटुंबांना हलवले, औरंगाबाद महापालिकेने शाळेत केली राहण्याची व्यवस्था

माधव इतबारे
Saturday, 26 September 2020

औरंगाबाद शहर परिसरात शुक्रवारी रात्री (ता.२५) झालेल्या पावसामुळे हर्सुल तलावातील पाणी पातळी वाढल्याने खामनदीला पूर आला.

औरंगाबाद : शहर परिसरात शुक्रवारी रात्री (ता.२५) झालेल्या पावसामुळे हर्सुल तलावातील पाणी पातळी वाढल्याने खामनदीला पूर आला. त्यामुळे नदी पात्रात अतिक्रमण करून राहणाऱ्या सुमारे दोनशे कुटुंबांची धावाधाव झाली. महापालिकेने शनिवारी (ता. २६) सकाळी या कुटुंबांना एका शाळेत सुरक्षित स्थळी हलवले.

शहर व परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे हर्सुल तलावातून पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात वाढला व खाम नदीला पूर आला. त्यामुळे नदीपात्रावर असलेल्या जलाल कॉलनी, हिलाल कॉलनी, आरेफ कॉलनी या भागातील नागरिकांची तारांबळ उडाली. या भागात नदीच्या पात्रात नागरिकांनी अतिक्रमणे करून घरे बांधली आहेत. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.

मोटारसायकलच्या अपघातात लाईनमनचा मृत्यू, औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

महापालिकेने देखील यापूर्वीच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयार केली होती. त्यानुसार वॉर्ड क्रमांक चारच्या पथकाने तातडीने धाव घेऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. पण रात्रीमुळे मदत करता आली नाही. दरम्यान शनिवारी सकाळी शहर अभियंता सखाराम पानझडे, वॉर्ड अधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पात्रात सुमारे दोनशे अतिक्रमण असल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रगती कॉलनी येथील महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले. काही नागरिकांनी किंमती साहित्यासह शाळेत बस्तान मांडले. अनेक जण नातेवाइकांकडे राहण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले.

पाण्याचा प्रवाह केला मोकळा
हर्सूल तलाव ओव्हारफ्लो झाल्यापासून खाम नदीपात्रातील अतिक्रमणांचा विषय गाजत आहे. अतिक्रमण हटाव विभागाने वारंवार पाहणी केली. मात्र अतिक्रमणे हटविण्यात आले नाहीत. दरम्यान आज जेसीबी मशीन आणि पोलकेनच्या साहाय्याने नदी पात्रातील पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला, घरांचे बांधकाम न पाडता आजूबाजूचे बांधकाम हटवून हे काम करण्यात आल्याचे नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Hundred Families Evacuated From Kham River Basin Aurangabad News