
एटीएम केंद्रात खात्यातील बचत रक्कम तपासण्यासाठी गेलेल्या व्यवसायिकाचे हातचलाखीने एटीएम कार्ड लांबवून भामट्याने अडीच लाखांची रक्कम हडपली. ही घटना ४ ते १८ डिसेंबरला दरम्यान घडली.
औरंगाबाद : एटीएम केंद्रात खात्यातील बचत रक्कम तपासण्यासाठी गेलेल्या व्यवसायिकाचे हातचलाखीने एटीएम कार्ड लांबवून भामट्याने अडीच लाखांची रक्कम हडपली. ही घटना ४ ते १८ डिसेंबरला दरम्यान घडली. एटीएम केंद्राच्या सीसीटिव्हीत भामटा कैद झाला असून त्याचा फुटेजवरुन पोलिस शोध घेत आहेत. रेल्वे स्टेशन रोडवरील कॅनरा बँकेच्या एटीएम केंद्रात श्रीपाद हिरालाल पाटणी (वय ८५, रा. रेल्वे स्टेशन रोड) हे ४ डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास बँकेच्या बचत खात्यातील रक्कम तपासण्यासाठी गेले होते.
त्यांना बचत खात्यातील रक्कम कशी तपासतात हे समजत नव्हते. त्यावेळी तेथे असलेल्या एकाने त्यांना बचत खात्यातील रक्कम तपासून देतो असे सांगत एटीएम कार्डचा पासवर्ड मिळविला. त्यानंतर कार्ड अदलाबदली करीत पाटणी यांना दुसरेच कार्ड दिले. भामट्याने दिलेले कार्ड घेऊन घरी गेल्यानंतर पाटणी यांना १८ डिसेंबरला एटीएम कार्डची अदलाबदली झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, तोपर्यंत भामट्याने त्यांच्या खात्यातील दोन लाख ४६ हजार ६९८ रुपये लंपास केले होते. या भामट्याने बीड जिल्ह्यातील गेवराईतील एका पंपावर दुचाकीत पेट्रोल भरल्याचेही पुढे आले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक राहुल भदरगे करीत आहेत.
Edited - Ganesh Pitekar