
जालना जिल्ह्याच्या पुत्राने बाईक रायडिंगचा नवा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर कोरला असून जालन्याचे नाव उंचावले आहे. भारतीय लष्करातील लान्स नायक पदावर कार्यरत असलेल्या गजानन मिसाळ यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील ग्राऊंडवर बुलेटच्या ब्रेक लाईटवर बसून १११ किलोमीटर दुचाकी चालविण्याचा विश्वविक्रम केला आहे.
जालना : जालना जिल्ह्याच्या पुत्राने बाईक रायडिंगचा नवा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर कोरला असून जालन्याचे नाव उंचावले आहे. भारतीय लष्करातील लान्स नायक पदावर कार्यरत असलेल्या गजानन मिसाळ यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील ग्राऊंडवर बुलेटच्या ब्रेक लाईटवर बसून १११ किलोमीटर दुचाकी चालविण्याचा विश्वविक्रम केला आहे. हा विश्वविक्रम दोन तास २७ मिनिट ५४ सेंकदामध्ये त्यांनी पूर्ण केला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील गजानन बबनराव मिसाळ हे २०१२ मध्ये लष्करामध्ये (आर्मीमध्ये) रूजू झाले होते.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची ता.२५ सप्टेंबर २०१२ मध्ये लष्कराच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या डेअर डेव्हिल्स या टीममध्ये निवड झाली. या टीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना दुचाकीचे संपूर्ण ज्ञान देण्यात आले. तसेच त्यांनी सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर २०१६ व २०१९ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या राजपथवरील परेडमध्ये त्यांचा सहभाग होता. तसेच २०१६ च्या लष्कराच्या परेडमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान डेअर डेव्हिल्स टीमच्या नावाने आतापर्यंत २८ विश्व रेकॉर्ड आहेत. २०१८ मध्ये ग्राऊंडवर सराव करत असताना बुलटेच्या ब्रेक लाईटवर (टेल लाईट) बसून दुचाकी चालविण्याचा लान्स नायक गजानन मिसाळ यांनी पहिला प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले. त्यानंतर त्यांनी ब्रेक लाईटवर बसून बुलेट चालविण्याचा सरावाला सुरवात केली आणि ते त्यात पारंगत झाले.
नुकत्याच पार पडलेल्या १९७१ च्या विजय दिनानिमित्त मध्य प्रदेशातील जबलपूर येथील सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या गौरीशंकर परेड ग्राऊंडवर सहा कॅमेऱ्यांच्या नजरेत बुलेटच्या ब्रेक लाइटवर बसून तब्बल १११ किमी अंतर दुचाकी चालविण्याचा विश्वविक्रम केला आहे. यासाठी त्यांना दोन तास २७ मिनिट ५४ सेकंदांचा कालावधी लागला आहे. लान्स नायक गजानन मिसाळ यांनी केलेल्या या विश्व विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जालन्याच्या भूमिपूत्राच्या या विश्वविक्रमामुळे जालन्याच्या मानात अजून एक तुरा रोवला गेला आहे.
लष्कारामध्ये दाखल झाल्यानंतर टीव्हीवर प्रजाकसत्ताक दिनाची परेड पाहत असताना आपण ही या परेडमध्ये सहभागी होण्याची स्वप्न पाहिले. त्यानुसार सराव करून ता. २५ सप्टेंबर २०१२ मध्ये लष्कराच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या डेअर डेव्हिल्स या टीम निवड झाली. त्यानंतर २०१६ व २०१९ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या राजपथवरील परेडमध्ये सहभाग घेतला. बुलेटच्या ब्रेक लाईटवर बसून दुचाकी चालविण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी ठरल्याने सराव करून आज हा विश्व विक्रम केला आहे. डेअर डेव्हिल्स टीमच्या नावे हा २९ वा विश्व विक्रम आपल्या नावे झाल्याने खूप आनंद आहे.
- गजानन मिसाळ, लान्स नायक, डेअर डेव्हिल्स टीम सदस्य, जबलपूर.
संपादन - गणेश पिटेकर