मुलाने कुत्र्याला दगड मारल्याचा जाब विचारताच चाकू हल्ला, औरंगाबादेत धक्कादायक घटना

सुषेन जाधव
Tuesday, 15 September 2020

बारा वर्षांच्या मुलाने कुत्र्याला दगड मारल्याचा जाब विचारताच भाजीपाला विक्रेत्या दोन मुलांनी १२ वर्षीय मुलावर चाकू हल्ला केल्याची घटना औरंगाबादेत घडली.

औरंगाबाद : बारा वर्षांच्या मुलाने कुत्र्याला दगड मारल्याचा जाब विचारताच भाजीपाला विक्रेत्या दोन मुलांनी १२ वर्षीय मुलावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणातील हल्ला करणारे दोन्ही संशयित विधिसंघर्ष बालक असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

औरंगबाद जिल्ह्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र बुधवारपासून रात्री नऊनंतर बाजारपेठा..

याबाबत उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जबिंदा इस्टेट परिसरात १३ वर्ष आणि १४ वर्षांचा असे दोन मुलं भाजीपाल्याची हातगाडी घेऊन फिरत होती. दरम्यान त्यांना एक कुत्रा भुंकला असता त्या मुलांनी कुत्र्याला दगड मारले. यावेळी एका १२ वर्षीय मुलाने दगड मारल्याचा जाब विचारला असता भाजीपाला विक्रेत्या मुलांनी भाजीपाला कापण्याचा गाड्यावरील चाकू घेत १२ वर्षीय मुलाच्या पोटात खुपसला आणि तिथून पळून गेले.

परिसरातील नागरिकांनी तात्काळ जखमी मुलाला दवाखान्यात भरती केले आहे. घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच घटनास्थळावरून भाजीपाला विक्रीची हातगाडी जप्त केली. तसेच चाकू हल्ला करणाऱ्या दोन्ही संशयित विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांनी दिली.

चालकाने लेकीच्या लग्नासाठी जमा केलेली १ लाखांची पुंजी ओळखीच्याच भामट्याने...

जखमी मुलाची प्रकृती गंभीर
या घटनेतील जखमी झालेल्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. सहायक पोलिस निरीक्षक उपेंद्र यांनी जखमी मुलाच्या नातेवाईकांचे जबाब नोंदविले आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Minor Children Stabbed Another One Aurangabad News