एकाच मुलीच्या नावावर दोघांनी दिली बारावीची परीक्षा, अजब बोर्डाचा गजब कारभार

संदीप लांडगे
Wednesday, 9 September 2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत एकाच नावाने दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचा अजब प्रकार औरंगाबाद विभागात घडला आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत एकाच नावाने दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचा अजब प्रकार औरंगाबाद विभागात घडला आहे. एका विद्यार्थ्याने मुलीच्या नावाने सहा पेपर दिले. हा प्रकार जालना जिल्ह्यातील मंठा येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात घडला आहे. याबाबत मंडळाला काहीच कल्पना नसल्याचे मंडळाच्या सचिवांचे म्हणणे आहे.

औरंगाबादहून दिल्लीसाठी आता १५ सप्टेंबरपासून दररोज विमानसेवा

याबाबत सविस्तर वृत्त असे, की फेब्रुवारी-मार्चदरम्यान मंडळाकडून राज्यभरात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला मंठा (जि.जालना) येथील या महाविद्यालयातील विद्यार्थी गणेश शिवाजी जगताप याने इयत्ता बारावी वाणिज्य शाखेसाठी आवेदन पत्र भरताना चुकीचा आयडी नंबर दिला. हा आयडी त्याच महाविद्यालयात कला शाखेला शिकणाऱ्या प्रतीक्षा गिराम या विद्यार्थिनीचा होता. त्यामुळे या विद्यार्थ्याच्या आवेदनपत्रावर मुलीचे नाव आले.

ही बाब महाविद्यालयाच्या लक्षात आल्यानंतर शुल्क भरून ता.१३ फेब्रुवारीला दुरुस्तीसाठी मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, बोर्डाकडून या विद्यार्थ्याला आवेदनपत्र दिले गेले नाही. १८ फेब्रवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्याला मुलीचे नावाने असलेल्या आवेदनपत्रावर सर्व पेपर द्यावे लागले. या प्रकरणाची मंडळाला आता जाग आल्याने विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्याची पुढील प्रवेशप्रक्रिया रखडली आहे.

७०ः३० कोटा पद्धत रद्द; मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांना मिळाला न्याय : आ....  

भरारी पथकाच्या लक्षात का नाही आली?
मंडळाकडून परीक्षेच्या काळात प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख तसेच भरारी पथकाची नियुक्ती केलेली असते. त्यामुळे ही बाब केंद्रप्रमुख अथवा भरारी पथकाच्या लक्षात का नाही आली? तसेच मंडळाच्या नियमानुसार शुल्क भरून आवेदनपत्र दुरुस्तीसाठी प्रस्ताव दाखल केला असताना मंडळातर्फे विद्यार्थ्याला त्याच्या नावाचे आवेदनपत्र का देण्यात आले नाही? निकाल राखून ठेवल्यामुळे विद्यार्थ्याची पुढील प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. विभागीय मंडळाच्या या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्याला का? असा प्रश्‍न मेस्टाचे शिवराम म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. याबाबत मंडळाच्या प्रभारी अध्यक्षा सुगता पुन्ने यांना विचारले असता त्यांनी चौकशी सुरू आहे, असे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Students Gave HSC Board On One Girl Name Aurangabad News