
‘महात्मा गांधी मिशन’च्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाड्यातील कुलगुरूंची परिषद शनिवारी (ता.१९) दुपारी पार पडली.
औरंगाबाद : आर्थिक बाबींसाठी विद्यापीठांनी यापुढे शासनावर अवलंबून न राहता स्वत:च उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत. त्यासाठी सुरवातीला मात्र शासनाच्या आर्थिक पाठबळाची गरज आहे. असा सूर कुलगुरूंच्या परिषदेत निघाला. ‘महात्मा गांधी मिशन’च्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाड्यातील कुलगुरूंची परिषद शनिवारी (ता.१९) दुपारी पार पडली.
एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात कार्यक्रम झाला. एमजीएमचे संस्थापक कमलकिशोर कदम अध्यक्षस्थानी होते.
परिषदेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे हे प्रत्यक्ष तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व्हर्च्युअली सहभागी झाले होते. डॉ. भोसले म्हणाले, ‘‘उच्चशिक्षण घेणारे केवळ पदवीसाठी येतात. नोकरीसाठीच शिक्षण असते. हा समज विद्यार्थ्यांच्या मनातून काढणे गरजेचे आहे.
शिक्षण आणि नोकरी एवढा मर्यादित विचार न करता रोजगाराभिमुख ज्ञान व कौशल्यप्राप्ती यादृष्टीने शिक्षणाकडे बघावे. सध्या आमचे विद्यापीठ संशोधन, पेटंट त्यानंतर उत्पादन घेण्यातही पुढे आहे. किडनीस्टोनसाठी उपयुक्त डेसीकॉल औषध ही विद्यापीठाची देण आहे. याचा अभिमान आहे.’’
‘‘मराठवाडा कोरडवाहू शेतीबहुल विद्यापीठ आहे. आमचेही शेतीविषयक विद्यापीठ असल्याने विज्ञानाची कास धरून कृषी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. याचा परिणाम म्हणून दोन ते आठ पटीपर्यंत उत्पादनात वाढ झाली.
उन्नत बियाणे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शक्य झाले. आजवर ३५ यंत्रे तयार केली. महिला मजूर डोळ्यांसमोर ठेवून कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, घर विज्ञान या विद्याशाखेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. फळ-भाजीपाला यात ४० टक्के नासाडी होते, ती रोखणे आमच्यासाठी आव्हान आहे.’’ असे डॉ. ढवण म्हणाले.संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, डॉ. सुधीर गव्हाणे, अर्थतज्ज्ञ डॉ. एच. एम. देसरडा यांनीही संवाद साधला. प्रत्यक्ष कार्यक्रमासोबत झूम, गुगल मीटद्वारे मान्यवर सहभागी झाले तर, फेसबुक लाइव्ह झाला.
विद्यापीठातील संशोधन पदवीपुरते : डॉ. येवले
‘‘सर्व विद्यापीठांनी किमान समान कार्यक्रम राबवला पाहिजे; तसेच विद्यापीठातील प्रत्येक गोष्टीला कुलगुरू जबाबदार नसतो, तिथे टीमवर्क महत्त्वाचे आहे. संशोधन हा पिंड आहे, ते प्राध्यापकांना बंधनकारक केल्याने त्याचा दर्जा राहत नाही. विद्यापीठातील संशोधन हे पदवीपुरते मर्यादित राहिले,’’असे परखड मत डॉ. येवले यांनी मांडले. मराठवाडा, विदर्भात दुष्काळ आणि बेरोजगारी हे प्रश्न सारखेच असून शेतमजूर, शेतकऱ्याच्या आत्महत्येकडे उच्चशिक्षितांनी सामाजिक बांधिलकीतून पाहिले पाहिजे.
Edited - Ganesh Pitekar