जवानाच्या प्रेमापोटी राज्यमंत्री बनसोडेंनी केला मोटारसायकलवरुन प्रवास, प्रोटोकॉल ठेवला बाजूला

युवराज धोतरे/शिवशंकर काळे
Saturday, 19 December 2020

पाणीपुरवठा व स्वच्छता, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कोळनुर (ता.जळकोट) येथे दौऱ्यावर असताना ताफा सोडून एका मोटारसायकलवर प्रवास करून स्वतःमधील साधेपणा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.

उदगीर /जळकोट (जि.लातूर) : पाणीपुरवठा व स्वच्छता, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कोळनुर (ता.जळकोट) येथे दौऱ्यावर असताना ताफा सोडून एका मोटारसायकलवर प्रवास करून स्वतःमधील साधेपणा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. दोन दिवसांपूर्वी कोळनुर (ता.जळकोट) येथील नव्याने सुरू झालेल्या एका लंच होमला सदिच्छा भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान प्रकाश नरवटे यांच्या प्रेमापोटी राज्यमंत्री बनसोडे यांनी त्यांच्या मोटारसायकलवर बसून दोन किलोमीटरचा प्रवास केला. त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली.

 

 

राज्यमंत्री बनसोडे यांच्या सोबत प्रोटोकॉलनुसार असलेला ताफा, राजशिष्टाचार सोडून मंत्री महोदय अचानकपणे मोटरसायकलवरून प्रवासाला निघाल्याने त्यांच्या ताफ्यातील सर्वांची धांदल उडाली. सामान्यांची नाळ असलेले राज्यमंत्री बनसोडे नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांची कनेक्ट असतात. याचे हे उदाहरण आहे. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सामान्य नागरिकांच्या संपर्कात असलेले व यावेळी आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले तरीही ते अजूनही मतदारसंघातील सामान्य नागरिकांची थेट फोनवर संपर्कात असतात. सामान्य नागरिकांना नावासहीत ओळखतात. मंत्री असतानाही मंत्रीपद कुठेही आड येऊ न देता ते लगेच जनसामान्यात सहभागी होतात. त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती नोंदवितात. ही त्यांच्यातील विशेष बाब नागरिकांना भावत आहे.

 

कौटुंबिक नाळ जोपासणारे मंत्री
उदगीर मतदारसंघातील उदगीर, जळकोट तालुक्यात सध्या सुरू असलेल्या लग्नसमारंभ साखरपुडा या कार्यक्रमास राज्यमंत्री श्री बनसोडे हे आवर्जून उपस्थित राहतात. शिवाय एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मृत झाला तर त्या कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठीही राज्यमंत्री उपस्थित राहत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Of State Sanjay Bansode Travels By Motorcycle With Army Person Udgir