बिबट्याच्या शोधार्थ नागरिक, वन कर्मचाऱ्यांचीही दमछाक; पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात भीतीचे वातावरण

Leopard
Leopard

पाचोड (जि.औरंगाबाद) : सहा दिवसांपासून बिबट्या आल्याच्या चर्चेने सर्वत्र दहशत पसरुन शेत शिवार ओस पडले. शेतावर कामांसाठी गेलेल्या महिलांसह पुरुष मंडळी ‘आला रे..... आला .. बिबटया आला’ असे म्हणत बिबट्याचे दर्शन झाल्याची माहीती देत असल्याने महीला- मुले शेतातील अर्धवट कामे सोडून गावांकडे परतत आहे. तर गावागावात नवयुवक व वरिष्ठ अधिकारी वगळता एक -दोन वन कर्मचारी दिवाळी सणाकडे पाठ फिरवत बिबट्याच्या शोधार्थ चिखल तुडवत रानोमाळ फिरत आहेत. रांजनगाव (दांडगा) व लिंबगाव परिसरात शुक्रवारी (ता. १३)शनिवारी (ता.१४) असे चित्र पहायला मिळाले.

आठ दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीपोटी शेतामध्ये कामे करण्यास कोणी धाडस करण्यास तयार नाही. ऐन शेतीकामाच्या लगबगीच्या दिवसांत शेत शिवार ओस पडल्याचे चित्र पाचोडसह रांजनगाव दांडगा, मुरमा, कोळी बोडखा, खादगाव, थेरगाव सोनवाडी परिसरात पाहवयास मिळते. आठवडाभरापूर्वी पाचोडपासून जवळच असलेल्या जामखेड शिवारात बिबट्याने कापूस वेचणी करण्यासाठी गेलेल्या महिलेवर जीवघेणा हल्ला केला, तर सात महीन्यापूर्वी थेरगाव येथे ग्रामस्थांच्या प्रयत्नातून बिबटया जेरबंद करण्यात आला होता. या दोन्ही घटनांचे विस्मरण होण्यापूर्वीच बिबटयाचे पारिसरात पून्हा दर्शन झाल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. बिबटया आल्याच्या चर्चेने वनविभागाचे उमेश मार्कडे, सचिन तळेकर व गावागावांतील युवकांच्या दिवाळीवर विरजण पडले. दिवसभर ते बिबट्याचा शोध घेत त्याच्या ठशाची पाहणी करता करता त्यांची दमछाक झाली.


शुक्रवारी (ता.१३) व शनिवारी (ता.१४) रांजनगाव व लिंबगाव शिवारात बिबट्या दोन बछडयासह शेतमजूराच्या दृष्टीस पडला. दिवसभर त्यांचा शोध घेऊन सर्वजण आपापल्या घरी परतले तोच सायंकाळी रांजनगाव दांडगा शिवारात पुन्हा बिबट्या दोन बछड्यांसोबत मुक्त संचार करतांना दृष्टीस पडला. त्यामुळे शेत शिवार पुन्हा ओस पडले.
शुक्रवारी दुपारी व सायंकाळी बिबट्याचे बछडयासह दर्शन झाल्याचे अनेकांनी सांगितले. पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे, भगवान धांडे, वनविभागाचे उमेश मार्कंडे, सचिन तळेकर यांनी नागरिकांना एकटे न फिरता साथीदारासह शेतावर जाण्याच्या व सोबत प्रतिकारासाठी काठी ठेवून सावध राहण्याचा इशारा दिला. सध्या बिबट्याचा मुक्काम रांजनगाव,लिंबगाव शिवारातच असण्याची शाश्वती असून वन विभागाने तातडीने या बिबट्याचा शोध घेण्याची तसदी घ्यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजूनाना भुमरे, शागीर पटेल, अफसर पटेल, माजी सरपंच आजिज पटेल, कठ्ठू पटेल यांनी केली आहे.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com