राज ठाकरे यांच्याविरुद्ध कोर्टात जाणार विनोद पाटील; शिवसेनेनेही केला निषेध

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

अस्तित्त्वासाठी धडपडणाऱ्या मनसेने आज मुंबईतल्या अधिवेशनात नवा झेंडा पुढे आणला आहे.शिवप्रेमींनी आवाहन करूनही या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरली आहे. याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे.

औरंगाबाद : अस्तित्त्वासाठी धडपडणाऱ्या मनसेने आज मुंबईतल्या अधिवेशनात नवा झेंडा पुढे आणला आहे. मात्र शिवप्रेमींनी आवाहन करूनही या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरली आहे. याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईमध्ये होत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनात या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 'राजपुत्र' अमित ठाकरे यांचेही लॉंचिंग दिमाखात होत आहे.

सायंकाळी होणाऱ्या भाषणात पक्षाची पुढील ध्येय धोरणे आणि विचारधाराही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट केली जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, तत्पुर्वीच मनसेचा नवा झेंडा फडकण्यापुर्वीच वादात सापडला आहे. 

 राज्य सरकारसोबतच निवडणूक आयोगाला पत्र

मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून न्यायालयीन लढाई लढणारे आर. आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला होता. जर मनसेने राजमुद्रेचा वापर केला तर केंद्र, राज्य सरकारसोबतच निवडणूक आयोगाला पत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले होते.

आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर आपण न्यायालयात जाऊ, असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे. 

राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायद्यात समावेश करा

राज्य आणि केंद्र सरकारने शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान कधीही होऊ नये, कोणी करू नये म्हणून राजमुद्रेचा समावेश 'राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा- 1971' मध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात येणार आहे. राजमुद्रा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणीही शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर राजकारणासाठी करू नये, अशी विनोद पाटील यांनी मागणी केली आहे. आठवडाभरापूर्वी विनोद पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंतीपत्रही पाठवले होते. मात्र त्याचे काहीही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार विनोद पाटील यांनी केला आहे. 

शिवसेनेने खेद व्यक्त केला

शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनीही राज ठाकरे यांचा निषेध केला आहे. राजमुद्रा हे भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे. तिचा राजकीय कारणासाठी वापर करणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinod Patil Knock The Court Door Against Raj Thackeray MNS News Breaking News